आपल्याला आपल्यातल्याच लोकांनी तर आव्हान दिले आहेच, पण एकेकाळी मित्र असलेल्यानेही आव्हान दिले आहे. शिवसेनेला आव्हानांची सवय आहे. जिथे शिवसेना, तिथे आव्हान असतेच. पण आता हे शेवटचेच आव्हान. हे आव्हान मोडायचे म्हणजे मोडायचेच. हे आव्हान मोडल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा शत्रू शिल्लक ठेवणार नाही. शिवसैनिकाच्या मदतीने आणि साथीने हे आव्हान मोडून काढणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. अजूनही आपल्याकडून काही जण तिकडे जात आहेत. मला यामुळे कसलाही धक्का वगैरे बसत नाही. शिवसेना धक्काप्रूफ आहे. रोज आपल्याकडच्यांना फोन करतात. भाडोत्री-विकाऊ जे असतील, त्यांना अजूनही घेउन जा. हवे तर मला सांगा, मीच यादी देतो. तुम्ही पीक कापून नेले असेल पण शेती आमच्याकडेच आहे, असेही त्यांनी बजावले. उद्या गद्दारीला एक वर्ष होत आहे. उद्या गद्दार दिन आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृह येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी जमलेल्या शिवसैनिकांना ते संबोधित करत होते. शिवसेनेसमोरचे हे शेवटचेच आव्हान असेल. हे आव्हान मोडल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा शत्रूच ठेवणार नाही, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आपल्याकडची गर्दी पैसे देउन,भाडयाने माणसे जमवून आणलेली नाही. ५७ वर्षांची ही तपश्चर्या आहे. तिकडे गारदी जमले आहेत. कोर्टाचा निकाल तर लागला आहेच. आता अध्यक्षांचाही लागेल. त्यानंतर यांना टुरिस्ट कंपनी काढून फिरावे लागेल. सोबतीला त्यांच्याकडे सूरत, गुवाहाटी फिरण्याचा अनुभव गाठिला आहेच. रेडा कुठे कापायचा. टेबलावर नाचायचे कसे. दिल्लीत मुजरा कसा करायचा हा अनुभव गाठिशी आहे. आज हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. भाजपाला जोपर्यंत त्यांचा उपयोग आहे तोपर्यंत पुंगी वाजवतील मग टोपलीत घालून कुठे सोडून देतील. सरकारचा जाहिरातीवर जितका खर्च होतोय तेवढे पैसे जरी शेतक-यांना दिले असते तरी शेतकरी खूष झाला असता असे उदधव ठाकरे म्हणाले. ते उलटया पायाचे नाही तर पळपुटया पायाचे आहेत. मी उमेद कधी हरलेलोच नाही. शिवसेनाप्रमुख आपल्याकडे बघत आहेत. ते आपली परीक्षा घेत आहेत. या संकटाला माझी फौज कशी मोडून तोडून टाकते ते शिवसेनाप्रमुख बघत आहेत असेही ते म्हणाले.
फडणवीसांचा हास्यजत्रेचा प्रयोग
‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग सादर केला. व्हिडिओ दाखवत ते म्हणाले कोविडची व्हॅक्सिन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केली. कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसला कळत नाही. कोविडची लस मोदींनी तयार केली तर संशोधक काय गवत उपटत बसले होते. असे अंधभक्त व त्यांचे गुरू म्हटल्यानंतर यांना व्हॅक्सिन देण्याची गरज आहे. त्यांना मानसिक रुग्णालयात समुपदेशनासाठी पाठवले पाहिजे. एकापेक्षा एक अवली आहेत लव्हली कोणीच नाही. तुम्ही अवली असलात तरी जनता कावली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.