भेटीचा ईडी नोटिसीशी संबंध नाही

जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण
भेटीचा ईडी नोटिसीशी संबंध नाही

पंढरपूर : शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली, पण याचा माझ्या बंधुंना आलेल्या ईडीच्या नोटीसीशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी येथे दिले.

पुण्यातील चांदणी चौक पूलाच्या उद‌्घाटनानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची एक गुप्त भेट झाली. या बैठकीला जयंत पाटीलदेखील उपस्थित होते. जयंत पाटील यांच्या बंधूना ईडीची नोटीस आल्याने, त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात पवार यांच्या गुप्त बैठकीत चर्चा झाल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जयंत पाटील हे अजित पवार गटाला पाठिंबा देण्याबाबतही गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.

यावर जयंत पाटील म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम होण्याचा प्रश्न नाही. लोक एकमेकांना भेटत असतात. विशेष सांगण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. ती गुप्तबैठक नव्हतीच. मी पवारसाहेबांसोबत गेलो आणि मी तिथून निघून आलो. बैठकीत काय झालं, हे मला माहित नाही. माझी भूमिका मी याआधीच स्पष्ट केली आहे. ईडी आणि गुप्तभेटीचा काही संबंध नाही. ईडीने माझ्या बंधुंना एका कंपनीबाबत माहिती विचारली आहे. चार दिवसांपूर्वीच ते जाऊन आले. ईडीला आवश्यक ती माहिती त्यांनी दिली आहे,’’ असे जयंत पाटील म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in