नांदेड : इतिहासामध्ये एखाद्या घटनेबद्दल अभ्यासकांची अनेक मतमतांतरे दिसून येतात; परंतु पुराव्याच्या आधारे इतिहासाच्या डोळसपणे अभ्यासातूनच वास्तवाची मांडणी शक्य असल्याचे उद्गार इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पदवी, पदव्युत्तर इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित इतिहास अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते सोमवारी (दि. ३०) बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे होत्या. यावेळी इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे, डॉ.संगीता शिंदे, डॉ. साईनाथ बिंदगे, प्रा.राजश्री जी.भोपाळे, प्रा.एन.डी.आंबोरे, प्रा.शितल सावंत यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. साईनाथ रोडे म्हणाले की, इतिहास संशोधकांनी सत्याचा विपर्यास न करता वास्तववादी इतिहास मांडण्याकडेच त्याचा कल असला पाहिजे; कारण इतिहासकार हा समाजाला इतिहासातून दृष्टी देण्याचं काम करत असतो. यावेळी इतिहास अभ्यास मंडळ व नंदगिरी भित्तिपत्रक फलकाचे अनावरण करण्यात आले. यासोबतच सिंधू संस्कृती मधील उत्खनन स्थलांतर्गत सापडलेल्या विविध वस्तूंवर प्रकाश टाकणारे नंदगिरी व शिखर संमेलन जी:२० शिखर संमेलन २०२३ या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.