काशीनाथाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात बगाड यात्रेला सुरुवात; राज्यभरातून भाविक लाखोंच्या संख्येने दाखल

साडेतीनशे वर्षांची परंपरा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेल्या सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रेला आजपासून सुरुवात झाली.
काशीनाथाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात बगाड यात्रेला सुरुवात; राज्यभरातून भाविक लाखोंच्या संख्येने दाखल
Published on

कराड : साडेतीनशे वर्षांची परंपरा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेल्या सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रेला आजपासून सुरुवात झाली. रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा होत असते. या यात्रेसाठी सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक लाखोंच्या संख्येने दाखल झाले आहेत.

बावधन येथे पार पडत असलेल्या बगाड यात्राचा या वर्षीचा बगाड्याचा मान हा अजित ननावरे यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे ५० फुटी बगाडाला नवसाचा मान मिळालेल्या बगाड्या भक्तास बांधले जाते. बैलांच्या सहाय्याने बगाड ओढले जाते. बगाड ओढायला सुमारे ५०० बैलांना जुंपले जाते. साडेतीनशे वर्षापासून ही यात्रा साजरी होत असून ५० फूट उंच बगाड गावापासून ५ किलोमीटर पर्यंत बैलांच्या मदतीने ओढले जाते.

या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाई पोलिसांकडून देखील कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

बावधन यात्रेचा बगाडी नेमका कसा ठरवला जातो?

या यात्रेतील सर्वात मुख्य आकर्षणाचा विषय असतो ते म्हणजे ‘बगाडी’ होय. या यात्रेदरम्यान दरवर्षी एका व्यक्तीला हा बगाडी होण्याचा मान मिळतो. हा बगाडी नेमका कसा निवडला जातो? बावधनचा हा बगाडी होळी पौर्णिमेला रात्री १२ वाजता ठरवला जातो. ग्रामस्थ आणि बावधन बगाड यात्रा समिती एकत्र येऊन कौल काढतात आणि बगाड्याचं नाव घोषित करतात. नुकताच हा कौल काढण्यात आला. यावेळी डाव्या बाजूला पाच कौल आणि उजव्या बाजूला पाच कौल असतात. म्हणजेच उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला गहू असतात. प्रत्येक नवसपूर्ती व्यक्तींच्या नावाने गहू गाभाऱ्यामध्ये लावले जातात. उजव्या बाजूचा जो गहू पडेल तो बगड्या म्हणून निवडला जातो. म्हणजे उजवा कौल ज्याच्या नावाने लागेल त्याच्यावर बगाड येते. यानंतर सर्वांच्या संमतीनं पंच बगाड्याचं नाव घोषित करतात.

‘अगं बाई अरेच्चा’मध्ये दाखवलेली साताऱ्यातील सर्वात मोठी ‘बगाड यात्रा’

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन बगाड यात्रेची आठवण करून देते ते ‘ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती…’ हे गाणे. हे गाणे ऐकल्यावर आपसूकच तुम्हाला ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटाची आठवण होते आणि या गाण्यातील बगाड यात्रेतील बगाड्याचे क्षण डोळ्यासमोर उभे राहतात. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘बगाड यात्रा’ आज पार पडत आहे.

काय आहे बगाड यात्रेची परंपरा?

'बगाड' हे या यात्रेचं मुख्य आकर्षण. ओझर्डे गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या तिरावर असलेले 'सोनेश्वराचे मंदिर' १८ व्या शतकात पिसाळ देशमुखांनी बांधले आहे. श्री शंकराची आकर्षक पिंड येथे असून पिंडीसमोरील नंदीच्या गळ्यात बगाड्याची प्रतिकृती आहे. सुमारे ३५० वर्षांपासून बगाड यात्रेस सुरुवात झाली. होळी पौर्णिमेला भैरवनाथाच्या मंदिरात 'नवसकार्याचा' कौल लावला जातो. उजवा कौल ज्याचा तो 'बगाड्या' ठरतो. यात्रेच्या मुख्य दिवसापर्यंत बगाड्या भैरवनाथाच्या मंदिरातच राहतो. होळी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत बगाड्याचा उपवास असतो. बगाडाचा रथही वैशिष्ट्यपूर्ण असतो. गावच्या थोरल्या विहिरीतील बगाडाचे खांब, कणा, बोटले रथासाठी वाजतगाजत मंदिरासमोर आणतात. बगाडाचा रथ तयार करणे हाही यात्रेचाच भाग आहे. या रथाला दोन मोठी दगडी चाके असतात. १० फूट लांबीच्या कण्याला १८ फूट उंच वाघाचे तोंड असलेले खांब जोडून त्यावर ४० फूट उंच बांबूंचे शीड विशिष्ट कोनात बांधले जाते. शीडाच्या टोकाला झोपाळा असतो. त्यावर लोखंडी गळात बगाड्याला टांगले जाते.

logo
marathi.freepressjournal.in