
मुंबई : पानिपतची लढाई ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे. पानिपतची लढाई मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असून आमचा पराभव झाला असे कोणीच मानत नाही. त्यामुळे पानिपत येथील काला आंबा येथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून स्मारक उभारणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
पानिपतची लढाई मराठ्यांच्या लढाई प्रतीक नाही पराभवाची आठवण करून देणारी आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आव्हाड यांच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत अंतिम आठवड्याला उत्तर दिले.
पानिपतमधून उर्जा घेऊनच महादजी शिंदेंनी नंतर दिल्ली जिंकली, छत्रपती शिवरायांचा भगवा देशात लावला. या देशासाठी मराठे लढले. म्हणूनच आमच्या शौर्याचे स्मारक तयार झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून स्मारक उभारण्याची घोषणा केली होती.
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सदस्य जितेंद्र आव्हाड म्हणाले, पानिपतचे कुठलेही स्मारक हे पराभवाची आठवण करून देणारे आहे. पानिपतात मराठे जिंकले नाही तर मराठ्यांचा दारुण पराभव झाला हा इतिहास पुसता येणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पानिपतची लढाई ही आमच्या शौर्याची लढाई आहे. अब्दालीशी मराठ्यांचा काहीच संबंध नव्हता. मराठ्यांनी त्यावेळेला देशात आपली ताकद उभी केली होती. तेव्हाचा दिल्लीचा बादशहा मराठ्यांना चौथाई दयायचा. ज्यावेळी अहमदशहा अब्दालीने येऊन दिल्लीवर कब्जा केला तेव्हा बादशहाने मराठयांना पत्र लिहिले मदतीला या. मराठ्यांनी दिल्ली जिंकली. तेव्हा अब्दालीने मराठ्यांना पत्र पाठविले, आपण समझोता करू. पंजाब, सिंध, बलुचिस्तान हा माझा प्रदेश हे मान्य करा, उर्वरित भारत मराठयांचा हे मान्य करतो. त्याआधी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते. त्याचा बदला घेण्यासाठी तो आला होता. पण मराठ्यांनी उत्तर पाठविले एक इंचही जमीन देणार नाही. त्यामुळे पानिपतची लढाई झाली. ती लढाई मराठे जिंकले होते. मराठ्यांना कोणाचीच मदत झाली नाही, तरीही मराठे भारतासाठी लढले, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणारच
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला असा शवविच्छेदन रिपोर्ट आला असला तरी विसेराचा अहवाल यात तफावत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मृत्यूचे खरे कारण विसेराच्या अहवालानंतर स्पष्ट होते. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळवून देणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी जे लागेल ते करू. एका रूममध्ये नर्सिंग कॉलेज कोणी चालवत असेल तर चौकशी करून ते बंद करण्यात येतील. पण या कॉलेजेसची आवश्यकता आहे. त्यात अनियमितता असतील तर बघू. नागपूर दंगलीत प्यारेखानचा त्या चादर घटनेशी काहीच संबंध नाही. उलट त्याने हिंदू-मुस्लिम एकतेसाठी बैठका घेतल्या असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.