मुरूड-जंजिरा : मुरूड तालुक्यातील किनारपट्टीवर सीगल पक्षी अवतरले असून या पाहुण्यांनी मुरूडसह राजपुरी, आगरदांडा समुद्रकिनारे गजबजले आहेत. मुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुणे अर्थात सीगल पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसल्याने पर्यटकांचे ते आकर्षण ठरत आहे. साधारण ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत किनाऱ्यावर सकाळ, संध्याकाळ सीगल पक्ष्यांचा मुक्काम राहतो. विशेषतः थंडीचा हंगाम सुरू होताच या पक्ष्यांची गर्दी वाढायला लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
आगामी दोन-तीन महिने समुद्र किनारपट्टी या पक्ष्यांनी किनारपट्टी फुलून गेली आहे. सकाळ, संध्याकाळ समुद्रावर फेरफटका मारणाऱ्या स्थानिकांसह पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. थंडीच्या कालावधीमध्ये लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या बर्फामुळे या पक्ष्यांना पुरेसे खाद्य आणि वास्त्यव्याला अनुकूल असलेल्या परिसरात सीगल पक्षी दरवर्षी काही कालावधीसाठी स्थलांतरित होतात.
लाल चुटूक पोच, पांढरे शुभ्र पिसांचे आकर्षण आणि देखणे शरीर मन वेधून घेते. यंदा थंडीचा मोसम लांबल्याने पक्ष्यांचे आगमन देखील लांबले आहे. सीगल पक्ष्यांचे थवे समुद्रकिनारी पाहणे खूपच आल्हाददायक वाटते.
मुरूडच्या किनाऱ्यावर सीगलची प्रचंड संख्या सकाळी पहावयास मिळत आहे. या पक्ष्यांमुळे किनाऱ्याचा नजारा आणखीनच खुलून गेला आहे. सफेद कलरचे हे पक्षी सर्वांना आकर्षक करत असले तरी हे पक्षी मुरूडच्या किनाऱ्यावर पहावयास मिळणे हे इतर पर्यटकांसाठी आनंददायी ठरत आहे.
- अक्षय संजय बागुल, पर्यटक, उंड्री पुणे