कायदा मोडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकारे भडक भाषणांची पुनरावृत्ती झाल्यास धार्मिक दंगल भडकली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने मुंबई व मीरा-भाईंदरच्या पोलीस आयुक्तांना भाजप आमदारांच्या भडकाऊ भाषणांच्या रेकॉर्डिंगचा आढावा घेण्याचे आदेश देत याचिकेची सुनावणी १५ एप्रिलपर्यंत तहकूब ठेवली.
कायदा मोडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक दंगल उसळवण्याचे भाजपचे षड्यंत्र असून धार्मिक तेढ निर्माण करणारी भडकाऊ विधाने करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. कायदा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय करू नका, तातडीने कारवाई करा, असा आदेशच न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिला.

तसेच मुंबई आणि मीरा-भाईंदरच्या पोलीस आयुक्तांना नितेश राणे, गीता जैन, टी. राजा यांच्या भाषणांच्या रेकॉर्डिंग पाहून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

भाजप आमदारांनी मीरा रोड, मालवणी, गोवंडी, घाटकोपर अशा विविध ठिकाणी भडकाऊ विधाने करत धार्मिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. याचा लोकसभा निवडणूक काळात विपरीत परिणाम होऊ शकतो, धार्मिक दंगल भडकू शकते. या पार्श्वभूमीवर पोलिसांना तातडीने संबंधित आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी याचिका खार येथील शिक्षिका अफताब सिद्विकी व अन्य रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकेवर न्या. मोहिते-डेरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गायत्री सिंग, अ‍ॅड. विजय हिरेमठ यांनी भाजप आमदार निवडणुकीत धार्मिक दंगल उसळवण्याच्या हेतूने भडकाऊ भाषणे देत असल्याचा आरोप केला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकारे भडक भाषणांची पुनरावृत्ती झाल्यास धार्मिक दंगल भडकली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने मुंबई व मीरा-भाईंदरच्या पोलीस आयुक्तांना भाजप आमदारांच्या भडकाऊ भाषणांच्या रेकॉर्डिंगचा आढावा घेण्याचे आदेश देत याचिकेची सुनावणी १५ एप्रिलपर्यंत तहकूब ठेवली.

logo
marathi.freepressjournal.in