नागपूर : काँग्रेसने घटनेबाबत जे ‘फेक नरेटिव्ह’ पसरविले त्याचा फुगा आता फुटला आहे, असत्य अल्पायुषी असते, असा हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षावर चढविला. महायुती पुन्हा निवडून आली तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार एकत्र बसून ठरविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून फडणवीस यांनी आपली निवडणूक प्रचाराची सुरुवात केली, त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस सलग पाच वेळा नागपूरमधून विजयी झाले आहेत. आपला मतदारसंघ हे आपले कुटुंब आहे आणि कुटुंबाचे आपल्यावर प्रेम आहे. त्यामुळे जनता सलग सहाव्यांदा आपल्याला विजयी केल्याविना राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्ष पुन्हा नरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न करील का, असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, असत्य अल्पायुषी असते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी नागपूरमध्ये असून ते संविधान सन्मान संमेलन आयोजित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर आणि देशामध्ये घटनेची अंमलबजावणी करण्याचे धैर्य दाखविले. काँग्रेसची तशी कधीही इच्छा नव्हती याची जनतेला जाणीव आहे.
महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय
आपण पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे, मात्र महायुती म्हणून आम्ही सत्तेत आहोत. महायुतीचा विजय झाल्यानंतर आम्ही एकत्रितपणे मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.