मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला; फडणवीस यांनी घेतली मोदी, शहा यांची भेट

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास आठवडाभरानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी ५ डिसेंबरला शपथ घेतल्यानंतरही महायुतीला जागावाटपाचा तिढा सोडवता आलेला नाही.
मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला; फडणवीस यांनी घेतली मोदी, शहा यांची भेट
Published on

नवी दिल्ली : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास आठवडाभरानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी ५ डिसेंबरला शपथ घेतल्यानंतरही महायुतीला जागावाटपाचा तिढा सोडवता आलेला नाही. अखेर दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून भाजपला २०, शिवसेनेला १२ आणि राष्ट्रवादीला १० मंत्रिपदे मिळू शकतात, अशी चर्चा आहे.

फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी घेतल्या. मात्र, अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी सर्वांसमक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून अमित शहा यांनी मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित केल्याचे समजते. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला किती मंत्रिपदे द्यायची, कोणती मंत्रिपदे कोणाला मिळणार, यावरही चर्चा करण्यात आली. या चर्चेत गृहमंत्रीपद कोणाला मिळणार, यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.

विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून कोणाला मंत्रिपद द्यायचे, याचा निर्णय त्या-त्या पक्षप्रमुखांना देण्यात आला आहे. भाजपच्या मंत्रिपदाचा निर्णय हे भाजपचे संसदीय मंडळ घेणार आहे. “आम्ही अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आमच्या पक्षाच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल, याविषयी बावनकुळे आणि मी पक्षप्रमुखांशी बोललो आहे. आमच्यात सविस्तर चर्चा झाली असून तशी एक यादीदेखील आम्ही वरिष्ठांना दिली आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ आम्हाला कळवतील,” असे फडणवीस यांनी सांगितले.

दिल्लीत खातेवाटपाच्या या बैठकीनंतर गुरुवारी रात्री मुंबईत महायुतीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी जोरदार चर्चा असली तरी ही तारीख माध्यमांनी ठरवली आहे. आम्हाला आमची तारीख ठरवू द्या, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गृह मंत्रालयावर शिंदे ठाम

शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालय होते. त्यामुळे महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळत असेल तर गृह खातेही मिळायला हवे, असा शिंदे गटाचा युक्तिवाद आहे. भाजपने गृह, महसूल, उच्च शिक्षण, कायदा, ऊर्जा, ग्रामीण विकास ही खाती आपल्याकडेच ठेवली असून शिवसेनेला आरोग्य, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग ही खाती दिली आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला अर्थ, नियोजन, सहकार, कृषी आदी खाती मिळू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in