"तुमची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली, या दाढीकडे खूप नाड्या", ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला समाचार

मला बोलायला लावू नका. माझा नाद करू नका, मला हलक्यात घेऊ नका. तुम्ही हलक्यात घेतले, दोन वर्षांपूर्वी काय झाले ते...
"तुमची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली, या दाढीकडे खूप नाड्या", ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला समाचार

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. “मुख्यमंत्री पद सोडताना मी हा विचार नाही केला की पद कसे सोडू? मला चिकटून राहायचे असते तर मी राहू शकलो असतो. पण कळत नव्हते का की माझे आमदार फुटतायत? त्यांना पकडून हॉटेलमध्ये ठेवू शकत नव्हतो? या मिंध्यांच्या दाढीला खेचून कुठूनही उचलून आणले असते. पण सगळ्यात आधी नासके आंबे फेकून दिले”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. ठाकरे यांनी केलेल्या या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते धाराशिव जिल्ह्यातील तेरणानगर ढोकी येथील शिवसंकल्प अभियान-कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

या दाढीकडे खूप नाड्या-

"तुम्ही दाढी खेचून खाली आणू म्हणता, पण, तुम्ही अडीच वर्षात माडी खाली उतरले नाही, तुम्ही दाढी कशी खेचणार. तुमची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे विसरू नका. या दाढीकडे खूप नाड्या आहेत. मला बोलायला लावू नका. माझा नाद करू नका, मला हलक्यात घेऊ नका. तुम्ही हलक्यात घेतले, दोन वर्षांपूर्वी काय झाले ते बघितले", असा इशारा शिंदे यांनी ठाकरेंना दिला.

एवढी पोटदुखी का?

"रोज आरोप प्रत्यारोप शिव्या,शाप, गावी जाऊन शेती केली तरी प्रॉब्लेम, हेलिकॉप्टरने गेलो तरी प्रॉब्लेम, चिखल माती तुडवत ईर्शाळवाडीत गेलो तरी प्रॉब्लेम, मुंबईतले रस्ते साफ करायला गेलो तरी प्रॉब्लेम, एवढा जळफळाट का आहे? एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाला त्याची एवढी पोटदुखी का?", असा सवालही शिंदे यांनी केला.

फेसबुक लाईव्हवरील प्रधानमंत्री-

"आपल्या हातात श्रीरामाचा धनुष्य बाण आहे. त्यांना त्यांची जागा दाखवू. तुमच्याकडे माणसेच नाहीत तर तुमच्याकडे शिवसेना कशी? रडगाणे रोज आहे, हे चोरले ते चोरले, यांना विचार नको, यांना स्वार्थ साधायचा होता. एका मिनिटात शिवसैनिकांच्या खात्यातील पन्नास कोटी त्यांनी घेतले. परवा त्यांना तर देशाच्या प्रधानमंत्रीचे स्वप्न पडले. फेसबुक लाईव्हवरील प्रधानमंत्री. सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतल्यावर ह्यांना सर्व सामान्य लोकांचे प्रश्न कसे कळणार? कुठे फेडणार हे पाप?", अशी विचारणाही शिंदे यांनी केली.

तुम्ही सगळेजण एकनाथ शिंदे बनून काम करा-

माझ्यासाठी तुम्ही सगळे मुख्यमंत्री आहात. मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन. लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणयच्या आहेत. मोदींचे हात बळकट करायचे आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्याने आपल्या राज्यातले सरकार आणायचे आहे. आपल्याला गावागावत संघटना वाढविण्याचे काम करायचे आहे. तुम्ही सगळेजण एकनाथ शिंदे बनून काम करा. मी जनतेचा सेवक बनून काम करत राहील, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in