
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सूत्र हाती घेतल्यापासून प्रत्येक दिवशी काहीनाकाही साधे फेरबदल हे लहानसहान गोष्टींमध्ये होताना दिसत आहेत. अशातच आज अनावश्यक वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉलची गरज नाही, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यांनी पोलिस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील पोलिसांचा बंदोबस्त कमी करून वाहनांना कुठेही अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सामान्य माणसाला प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
मुख्यमंत्री म्हणून मला सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात येते. त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. गेल्या तीन-चार दिवसात हे लक्षात आल्याने हा निर्णय घेत आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणारे लोक अडकले जातात. एखादी रुग्णवाहिका अडकल्यास कोणत्या तरी रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.