पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पोलिसांनीच तेही पोलीस ठाण्याच्या गेटवरच बोकडाचा बळी दिल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडल्याचे समोर येत आहे. यामुळे ज्यांच्यावर अंधश्रद्धा रोखण्याची जबाबदारी आहे त्यांनीच अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचे बोलले जात आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील हा प्रकार असून बोकडाचा बळी देतानाचा फोटोही समोर आला आहे. एवढेच काय तर या बोकडाची बिर्याणीही बनवल्याचे सांगितले जात आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
एका अधिकाऱ्याने वर्षभरापूर्वी या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतरही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात व गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण काही केल्या कमी होत नव्हते, याउलट ते वाढतच होते. यावर उपाय म्हणून पोलीस ठाण्यात बोकडाचा बळी देण्याची कल्पना एका अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठ अधिकाऱ्याला बोकड आणून पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी दिली. त्यानुसार एका अधिकाऱ्याने एक बोकड आणि त्याला कापणारा खाटीक यांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि पोलीस ठाण्याच्या गेटवरच बोकडाचा बळी देण्यात आला. पोलिसांच्या या कृतीमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून हा पुरोगामी महाराष्ट्रासाठी काळा डाग असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोकड कापल्यानंतर याच भागातील एका फार्म हाऊसवर त्याची बिर्याणी बनविण्यात आल्याची माहिती आहे.
गुन्हा दाखल करा -
राज्य शासनाने जादूटोणाविरोधी कायदा संमत केल्यानंतर तो समजावून सांगण्यासाठी 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ला आमंत्रित केले होते. मी स्वत: प्रत्येक ठाण्यात जाऊन कायदा समजावून सांगितला. अंधश्रद्धेपोटी बोकडाचा बळी दिला असेल तर कायद्याचे हे अपयश आहे. अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी म्हटले आहे.