वर्ध्याचे भाजप उमेदवार तडस अडचणीत; सुनेने केले कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमवेत नागपुरातील प्रेस क्लबमध्ये पूजा तडस यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी रामदास तडस, त्यांचा मुलगा पंकज तडस व त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर गंभीर आरोप केले.
वर्ध्याचे भाजप उमेदवार तडस अडचणीत; सुनेने केले कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप

वर्धा : वर्ध्यातील भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार रामदास तडस हे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर अडचणीत सापडले आहेत. तडस यांच्या सुनेने तडस कुटुंबीयांवर अत्यंत गंभीर आरोप करत आपल्या बाळाची डीएनए चाचणी करण्याची मागणी तडस कुटुंबीयांनी केल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविल्याने वर्धा लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ माजली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमवेत नागपुरातील प्रेस क्लबमध्ये पूजा तडस यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी रामदास तडस, त्यांचा मुलगा पंकज तडस व त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर गंभीर आरोप केले. पूजा तडस म्हणाल्या की, मला बाळ झाले त्यावेळी तडस कुटुंबीयांनी त्याचा बाप कोण? असा सवाल उपस्थित करत त्याच्या डीएनए टेस्टची मागणी केली. मला लोखंडी रॉडने मारण्यात आले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी २० तारखेला वर्ध्यात सभेसाठी येणार आहेत. त्यांनीच माझ्या मुलाला न्याय द्यावा. मला भेटण्यासाठी वेळ द्यावा.

मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचविण्यासाठी त्यांनी लग्न लावून दिले. रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी माझा केवळ उपभोगाची वस्तू म्हणून वापर केला. मला वेगळ्या फ्लॅटवर ठेवले. या लोकांनी मला म्हणजे आपल्याच सुनेला घराबाहेर काढले, असा आरोप पूजा तडस यांनी केला. मी डीएनए टेस्ट करायला तयार आहे, पण सर्व गोष्टी कोर्टाद्वारे व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनीही तडस यांच्यावर हल्ला चढवला व याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in