जालना : मराठवड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी रात्री जरांगे यांची भेट घेऊन मराठा आंदोलनाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, असे जरांगे म्हणाले. त्यामुळे जरांगे आणि फडणवीस यांच्यात संभाषण व्हावे यासाठी सत्तार यांनी मध्यस्थी केल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, असे आपण फडणवीस यांना सांगितल्याचे जरांगे म्हणाले. त्यावर मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत हा विषय मांडण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचेही जरांगे म्हणाले. मात्र दोघांमध्ये केवळ नुकसानभरपाईचीच चर्चा झाली की अन्य काही प्रश्नांवरही चर्चा झाली ते गुलदस्त्यातच आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जरांगे आणि फडणवीस यांच्यात अलीकडे चांगलीच जुंपली आहे. जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे सत्तार यांच्याशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करीत असतानाच नेमका फडणवीस यांचा दूरध्वनी यावा आणि जरांगे व फडणवीस यांच्यात केवळ शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबतच चर्चा झाल्याचे म्हणणे न पटण्यासारखे आहे, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.