प्रतिनिधी/मुंबई
राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी घेतल्या जात असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली. या नोटीसचे उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम गेल्या महिन्यात जाहीर केला. तेव्हापासून देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सतत राजकीय बैठका होत आहेत. या बैठका तत्काळ थांबायला हव्यात. हा आचारसंहितेचा खुलेआम भंग आहे. निवडणूक आयोग याची अजूनही दखल घेत नाही, अशी तक्रार प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी एक्स या समाज माध्यमातून केली होती.
या तक्रारीबाबत चोक्कलिंगम यांना विचारले असता त्यांनी या तक्रारीप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून या नोटिशीला उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात १६ मार्च २०२४ पासून ते ७ एप्रिल २०२४ या दरम्यान सी व्हिजिल या ॲपवर आचारसंहिता भंगाच्या १ हजार ८९४ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील १ हजार ८८७ तक्रारी निकालात काढण्यात आल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले.
३८ कोटींची रोख रक्कम जप्त
१ मार्च २०२३ ते ५ एप्रिल २०२४ या दरम्यान राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणांद्वारे ३१ कोटी १२ लाख रोख रक्कम, २४ कोटी २६ लाख रुपये किमतीचे मद्य, २०७ कोटींचे अमली पदार्थ तसेच ५५ कोटींचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आल्याची माहिती चोक्कलिंगम यांनी दिली.