
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आठही विधानसभा मतदारसंघांत महायुतीने आपला विजयी झेंडा फडकवला. साताऱ्यात भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे २ आणि अजित पवार गटाचे २ आमदार निवडून आले. निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या आठपैकी जिल्ह्यातील तब्बल चार आमदारांनी रविवारी सायंकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. शरद पवारांचा बालेकिल्ला फोडणाऱ्या या चार शिलेदारांच्या खांद्यावर लवकरच खाते विभागाची जबाबदारी दिली जाणार आहे. मात्र, यातील महत्त्वाची खाती मिळविण्यासाठी कालपासूनच 'लॉबिंग'ही सुरू केले आहे. त्यामुळे कोणाला कोणते खाते मिळणार याबरोबरच जिल्ह्याच्या 'पालकमंत्री'पदाची 'माळ' कोणाच्या गळ्यात पडणार याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
रविवारी सायंकाळी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या विस्तारीत मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा थाटात पार पडला. तब्बल ३९ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असतानाच आणखी काहींचा राज्यमंत्री म्हणून काही दिवसांतच पुन्हा शपथविधी सोहळा रंगणार असल्याने या सरकारचे हे 'जम्बो' मंत्रिमंडळ असणार हेही यातून स्पष्ट झाले आहे. मात्र या 'जम्बो'करणामुळे या वेळेस पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यास मंत्रिपदाची चांगलीच 'लॉटरी' लागली आहे. जिल्ह्यातून आ. शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपातून साताऱ्याचे सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले शिवेंद्रराजे भोसले यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील राजघराण्यातून सर्वात पहिल्यांदा दिवंगत अभयसिंहराजे भोसले हे राजकारणात सक्रिय होते. त्यांनी विधिमंडळात साताऱ्याचे बराच काळ नेतृत्व केले. कॅबिनेट मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्रीपदही त्यांनी सांभाळले होते. त्यानंतर सेना-भाजप युती सरकारच्या काळात उदयनराजे भोसले महसूल राज्यमंत्री होते. आता शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपाने साताऱ्यातील तिसरी व्यक्ती मंत्री होत आहे.
वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. खुद्द अजित पवार यांनीच मकरंद पाटलांच्या मंत्रिपदाबाबत थेट संकेत दिले होते. कराड येथे गेल्या २५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आलेल्या अजित पवारांना विचारण्यात आले होते की, सातारा जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची संधी आहे का? त्यावेळी अजित पवार यांनी ‘हो आहे,’ अशा शब्दात साताऱ्याला मंत्रीपदाबाबतचा शब्द जाहीरपणे दिला होता आणि तो शब्द त्यांनी पाळला. वाईतून मकरंद पाटील आमदार तर झालेच पण त्यापूर्वीच त्यांचेच लहान बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेच्या खासदारकीची 'लॉटरी' लागली होती. त्यामुळे सध्या वाईत मोठा भाऊ कॅबिनेट मंत्री, तर लहान भाऊ खासदार झाला आहे. अजित पवारांनी एकाच घरात मोठा भाऊ कॅबिनेटमंत्री, तर लहान भाऊ खासदार अशी दोन पदे दिली. वाई तालुक्याला खासदारकीसह मंत्रिपदाची लॉटरी लागल्याने जिल्ह्यातील बाकी तालुक्यांनाही अजित पवारांनी न्याय द्यायला पाहिजे होता, असा नाराजीचा सूर कानावर येऊ लागला आहे.
जयकुमार गोरे यांना कोणते खाते मिळणार?
जिल्ह्यातील पूर्वेकडील कायम दुष्काळी पट्ट्यातील माण खटाव मतदारसंघातून निवडून आलेले भाजप आमदार जयकुमार गोरे यांचीही फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एन्ट्री झाली आहे. पण आता त्यांच्या गळ्यात कोणत्या खात्याची माळ पडणार? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.