विदर्भातून सेलिब्रिटा वाघ बेपत्ता पाच महिन्यांत वन विभागाला पत्ताच नाही

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात या वर्षी वाघांची शिकार करणाऱ्या बावरिया टोळीला वन विभागाने अटक केली होती
विदर्भातून सेलिब्रिटा वाघ बेपत्ता पाच महिन्यांत वन विभागाला पत्ताच नाही

चंद्रपूर : वाघांनी समृद्ध असलेल्या विदर्भातील ताडोबा, टिपेश्वरच्या जंगलातून अनेक सेलिब्रिटी वाघ गेल्या काही दिवसांत बेपत्ता झाले आहेत. मात्र, त्यांचा शोध घेण्यात वन विभाग अपयशी ठरले आहे. क्वीन ऑफ ताडोबा म्हणून साऱ्या जभभर ओळख असलेली ‘माया’ वाघीण ऑगस्ट महिन्यांपासून बेपत्ता आहे, मात्र अद्याप तिचा शोध लागलेला नाही. त्यामुळे मध्य भारतातील वाघांवर शिकाऱ्यांची नजर पडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑगस्ट महिन्यापासून चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून माया वाघीण बेपत्ता आहे. तिचा मागमूस काढण्याचा चंद्रपूर वन विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, मायाचा अद्याप शोध लागलेला नाही. मायाची ‘क्वीन ऑफ ताडोबा’ म्हणून जगभर ओळख आहे. तिचे लाखो चाहते आहेत. माया वाघिणीचे लाखो फोटो-व्हिडीओ समाज माध्यमांवर लोकांनी आजपर्यंत शेअर केले आहेत. तिच्यावर डॉक्युमेंटरीदेखील निघाली आहे. डाक विभागाने तिच्या नावाचे टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे. मात्र, ही वाघीण ऑगस्ट महिन्यापासून अचानक बेपत्ता झाली आणि जगभरातील तिच्या लाखो चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. ताडोबातील कक्ष क्रमांक ८२ मध्ये नुकतेच एका वाघाचे अवशेष सापडले आहेत, ते मायाचे असण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप त्याची डीएनए चाचणी केलेली नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूची खात्री होत नाही. त्यामुळे मायाचं काय झालं, हे अजुनही स्पष्ट होत नाही.

याआधीही राज्यातू अनेक वाघ बेपत्ता झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘वॉकर’ या वाघाने १४ महिन्यांत टिपेश्वर-अजिंठा-आदिलाबाद आणि ज्ञानगंगा अभयारण्य असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास केला. मार्च २०२० मध्ये त्याला लावलेल्या कॉलरची बॅटरी संपली आणि हा वाघ बेपत्ता झाला. नागपूर जिल्ह्यातील उमरेड-करांडला अभयारण्यातील ‘जय’ अवघ्या पावणेदोन वर्षाचा असताना रानगव्याची शिकार करणारा मध्य भारतातील सर्वात धिप्पाड वाघ, अशी त्याची ओळख होती. सचिन तेंडुलकर सारख्या सेलिब्रेटींनी हा वाघ पाहण्यासाठी उमरेड-करांडलाच्या अक्षरशः वाऱ्या केल्या. मात्र, एप्रिल २०१६ मध्ये जय अचानक बेपत्ता झाला. नागपूर जिल्ह्यातीलच कळमेश्वर-कोंढाळी परिसरातील ‘नवाब’ वाघ अचानक बेपत्ता झाला. नावाप्रमाणेच अतिशय देखणा आणि रुबाबदार या वाघाने अमरावती जिल्ह्यात स्थलांतर केलं आणि २०१८ मध्ये तो अचानक बेपत्ता झाला. इतक्या मोठ्या संख्येने सेलिब्रिटी वाघ बेपत्ता होत असताना वन विभागाला मात्र त्यांचा कोणताही सुगावा अद्याप लागलेला नाही, हे विशेष.

बेपत्ता वाघांवर चर्चाच नाही

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात या वर्षी वाघांची शिकार करणाऱ्या बावरिया टोळीला वन विभागाने अटक केली होती. या टोळीने चार वाघ मारले होते. या वाघांची कातडी आसाममध्ये सापडली होती. त्यावेळी या शिकारीचा वन विभागाला सुगावा लागला. तोपर्यंत आपल्या जंगलांतून वाघ गायब झाल्याची खबरही वन विभागाला नव्हती. दर चार वर्षांनंतर होणाऱ्या व्याघ्रगणनेचे आकडे जाहीर झाल्यावर वाघ वाढले म्हणून आपण उत्सव साजरा करतो. मात्र, दरवर्षी शिकारीमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या आणि अशा प्रकारे बेपत्ता होणाऱ्या वाघांबाबत काहीच चिंतन होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

logo
marathi.freepressjournal.in