आज राज्याच्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्यांविरोधात सरकार आणि विरोधकांनी संतप्त भूमिका व्यक्त केल्या. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांच्या मुसक्या बांधून आणलं पाहिजे अशी भूमिका मांडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही मुसक्या बांधण्याचं बोलता पण अशांना भर रस्त्यात फाशी दिली पाहीजे, असं विधान केलं.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमच्या माझ्या भावना कितीही तीव्र असल्या तरी कायद्याचे पालन आपल्याला केलं पाहिजे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या वेबसाईटने हे शेअर केले त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. मी सरकारमार्फत सावित्रीबाईंवर लिखाण करणाऱ्याचा निषेध करतो. भारद्वाज स्पिक हे ट्विटर हँडल विरोधात ट्विटर इंडियालाही पत्र पाठवलं असून पोलीस देखील त्यांच्या संपर्कात आहेत. त्याला कुठल्याही परिस्थितीत अटक केली जाईल. अलिकडच्या काळातील डिजीटल पेपर आहेत त्यात हे प्रसिद्द झालं आहे. त्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. काहीही झालं तरी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि कुठल्याही महापुरुषाविरोधात लिखाण होत असेल तर त्यांना पाठिशी घातलं जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.
यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगितलं. तसंच सरकारच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधी पक्षाने सरकारविरोधात घोषणा दिल्या. यावेळी सभागृहात मोठ्या प्रमाणात गोंधळ पहायला मिळाला. या गोंधळानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.