
धनंजय कवठेकर / अलिबाग
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर कोणत्या नेत्यावर कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाणार याबाबत अनेक तर्कवितर्कानंतर अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांपू्र्वी झाला. त्यानंतर काहींना खूश करण्यासाठी खातेवाटप देखील करण्यात आले, त्यातही माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांच्यात देखील खातेवाटपाबाबत नाराजी असल्याचे समोर आले. त्यातच आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरही कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच महायुतीच्या मंत्र्यांमध्ये काही महत्त्वाच्या शहरांच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच रायगडमध्ये शिंदेसेनेचे भरत गोगावले व अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली असून, पालकमंत्रिपदासाठी दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. मात्र, या दोघांच्या भांडणात बाहेरचा पालकमंत्री रायगडला मिळणार नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे.
महायुती सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. मात्र, पालकमंत्रिपदे जाहीर झालेली नाहीत. रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून मात्र महायुतीत धुसफूस सुरू आहे. भरत गोगावले यांना रोजगार हमी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडली आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रिपद गोगावले यांना मिळणार अशी चर्चा आहे. शिंदेसेनेच्या आमदारांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोगावले यांना पालकमंत्री करण्यासाठी साकडे घातले आहे, तर भाजप आमदारांकडूनही गोगावले यांना हिरवा कंदील आहे.
मात्र, महायुती सरकारच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे या देखील पालकमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीत पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी गोगावले आणि आदिती तटकरे इच्छुक आहे. त्यामुळे रायगड पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
भाजप तिसरा पर्याय
रायगडमध्ये तिन्ही पक्षात छुपा संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच मागील सरकारमध्येसुद्धा, राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याऐवजी शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे आमदार उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले होते. यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत रायगडचाच आमदार पालकमंत्री असेल असे सांगितले जात आहे. भरत गोगावले यांचे नाव आघाडीवर असले तरी तटकरेदेखील तितक्याच आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रिपद दिल्यास महायुतीत कुरघोडी होण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेला दिले तर राष्ट्रवादीत नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या वादात तिसरा पर्याय म्हणून भाजपच्या वाट्याला ही संधी जाऊन बाहेरचा पालकमंत्री तर होणार नाहीना, अशी कुजबुज सुरू आहे.