राज्यात दुधाचा प्रश्न पेटणार, दूध उत्पादक शेतकऱ्यांची उद्या 'ट्रॅक्टर रॅली'

दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्या २७ रुपये लिटर भाव मिळत असून त्यातून उत्पादनाचा खर्चही भागत नाही. या महागाईच्या काळात दूधाचा दर प्रति लिटर ४० रुपये करावा, यासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.
राज्यात दुधाचा प्रश्न पेटणार, दूध उत्पादक शेतकऱ्यांची उद्या 'ट्रॅक्टर रॅली'
FPJ
Published on

गिरीश चित्रे/मुंबई

दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्या २७ रुपये लिटर भाव मिळत असून त्यातून उत्पादनाचा खर्चही भागत नाही. या महागाईच्या काळात दूधाचा दर प्रति लिटर ४० रुपये करावा, यासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आपल्या या मागणीसाठी दूध उत्पादकांचे राज्यस्तरावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून २३ जुलैला अकोले तालुक्यातील कोतुळ येथे ‘ट्रॅक्टर रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. जोपर्यंत दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतल्याने राज्यात दुधाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यात आंदोलन सुरू आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी शेतकरी गेले १७ दिवस धरणे आंदोलनास बसले आहेत. गावातील शेतकरी बांधवांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून दिवसरात्र आंदोलन सुरु आहे. मात्र, जोपर्यंत दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतल्याचे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी ‘दैनिक नवशक्ति'शी बोलताना सांगितले. दूध उद्योगातील सर्व उत्पन्न सरकारच्या धोरणामुळे खाजगी व सहकारी दूध संघ व इतरांनी लुटून नेले आहे. शेतकऱ्याला या व्यवसायातून काहीच मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

logo
marathi.freepressjournal.in