मुंबई: विधवा महिला कुप्रथा निर्मूलनासाठी संसदेत कायदा होण्याची गरज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी बुधवारी (दि.१५) प्रतिपादन केली. दैनिक ‘नवशक्ति’च्या कार्यालयाला भेट देऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह देशभरातील विधवा महिलांच्या प्रश्नावर मार्मिक भाष्य केले.
पती निधनानंतर महिलांचे कुंकू पुसणे, त्यांचे मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे व जोडवी काढण्याची प्रथा माणुसकीला काळिमा फासणारी आहे. ही प्रथा अमानवी आहे. महिलांशी भेदाभेद करणारी आहे. त्यामुळे ही प्रथा बंद होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र सरकारने परिपत्रक काढले असले तरी राज्यातच नव्हे, तर संसदेतही विधवा महिला कुप्रथा निर्मूलनाचा कायदा होणे गरजेचे आहे, असे आग्रही मत झिंजाडे यांनी मांडले.
महाराष्ट्रातील २८ हजार गावांपैकी १५ हजार गावांनी विधवा महिला कुप्रथा निर्मूलनाच्यादृष्टीने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतींनी त्यासंबंधीचे ठराव केले आहेत. त्याचे अनुकरण अन्य ग्रामपंचायतीही करीत आहेत. विधवांकडे व्यक्ती, कुटुंब व समाजाने माणूस म्हणून बघणे व त्यादृष्टीने वागणेही आवश्यक असल्याचे ठाम मत झिंजाडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील संत, विचारवंत, थोर समाजसुधारकांनी केलेले कार्य लक्षात घेता, देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत वा जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत महिलांना अधिक चांगल्याप्रकारची वागणूक मिळत आहे. मात्र, अजूनही आपल्या राज्यात विधवांना अपेक्षित मानसन्मान दिला जात नाही. त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात वा कौटुंबीक सोहळ्यात हीन वा दुय्यम वागणूक दिली जात आहे. विधवा कुप्रथा निर्मूलनासाठी व्यक्ती, कुटुंब, समाजाने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गावामध्ये विधवा कुप्रथा निर्मूलनाचा ठराव व्हायला हवा. गावागावात प्रबोधनाच्यादृष्टीने कार्यशाळा व्हाव्यात. तसेच, विधवांबाबत बीडीओ, ग्रामसेवक, सरपंच यांनीही अधिक संवेदनशीलता दाखवायला हवी. प्रत्येक गावात विधवा कुप्रथा निर्मूलन समिती असावी व त्यात ५० टक्के महिला सभासद असावेत.
विविध राजकीय पक्षांनी हा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात आणायला हवा. कुप्रथा निर्मूलन हा ग्रामविकास व मानव विकासाचाच मुद्दा समजून विधवांना हळतीकुंकू, झेंडावंदन, देवाची आरती यात सहभागी करून घेण्याची आवश्यकता आहे. तसेच, विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा झिंजाडे यांनी व्यक्त केली.