
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत ५० हून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून गुरुवारी आणखी ८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मीरा-भाईंदर आयुक्तपदी राधा विनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास अधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रेन यांची बदली पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी, तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक वैदेही रानडे यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांची अल्पसंख्यांक विकास आयुक्त पदावर, तर संभाजीनगरच्या स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांची जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात अली.
सोलापूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम यांची ठाण्याचे अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी, नागपूर विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अर्जुन चिखले यांची मुंबई फी नियामक प्राधिकरणाचे सचिवपदी तर, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्या नगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.