मराठा मोर्चाला सुविधा मिळाल्या नाहीत; नवी मुंबई पालिकेवर आरोप

सरकारच्या दडपशाहीमुळे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मराठा मोर्चाला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मराठा मोर्चाला सुविधा मिळाल्या नाहीत; नवी मुंबई पालिकेवर आरोप

नवी मुंबई : सरकारच्या दडपशाहीमुळे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मराठा मोर्चाला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

मनोज जरांगे-पाटलांच्या नेतृत्वात २० जानेवारीपासून सुरू झालेल्या मराठा आरक्षण पायी दिंडीचा मुक्काम २५ जानेवारी रोजी नवी मुंबई शहरात होणार आहे. या नियोजनच्या तयारीसाठी मराठा क्रांती मोर्चा, नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय / वॉररूम बनवण्यात आले आहे. २५ जानेवारी रोजी करोडोच्या संख्येने मराठा समाज नवी मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्याची तसेच पाण्याची, टॉलेटची व्यवस्था करणेबाबत महानगरपालिका, सिडको, पोलीस तसेच एपीएमसी प्रशासन यांच्याशी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने पत्रव्यवहार केला आहे. सदर नियोजनात त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे; मात्र नवी मुंबई महानगरपालिकेकडून या संदर्भात अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

एपीएमसी मार्केटमध्ये निवासाची व्यवस्था

पाणी, फिरते शौचालय सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेकडे मागणी केली आहे; मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात आम्हाला शासनाकडून निर्देश नसल्याचे सांगितले. यावरून सरकार या मोर्चाला गंभीरपणे घेत नाही, असा आरोप बंसी डोके यांनी केला आहे. २५ जानेवारी रोजी सिडको प्रदर्शन केंद्रात महिलांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच करावे येथील तांडेल मैदान येथे आणि एपीएमसी मार्केट बंद ठेवून त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

केमिस्ट, ड्रग असोसिएशनच्या वतीने आरोग्य सुविधा

डॉ. जगताप म्हणाले की, नवी मुंबई केमिस्ट आणि ड्रग असोसिएशनच्या वतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक रुग्णालयात ५० टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत. प्रत्येक २ किलो मीटरवर वैद्यकिय पथक ठेवण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाखोंच्या संख्येने तिरंगा फडकवून मोर्चा पुढे मुंबईत जाणार आहे, असे पोखरकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in