अपघातांची महानगरे

रस्त्यांवर दिवसागणिक होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे
अपघातांची महानगरे

मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांचा दर्जा आणि एकूणच स्थिती हा राज्यातील जनतेसाठी नुसता चर्चेचा विषय राहिलेला नसून, अशा रस्त्यांवरून सदोदित प्रवास करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक यातना देणारा व मनस्वी चीड आणणारा आहे. म्हणूनच तो एक ज्वलंत सामाजिक प्रश्न बनलेला आहे. एक दशकाहून अधिक काळ रखडलेला आणि अनेकांचा बळी घेत असंख्य लोकांना अर्धमेल्यासारखे करणारा मुंबई-गोवा महामार्ग हे त्याचे जिवंत उदाहरण! असे यातनादायी आणि मनस्ताप देणारे अनेक रस्ते राज्यात आहेत. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बरोबरच, या रस्त्यांवर दिवसागणिक होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे. राज्यातील गेल्या चार महिन्यांतील समोर आलेली रस्ते अपघातांची माहिती धक्कादायक आहे. असंख्य लोकांना रोजीरोटीसह अनेक गोष्टींसाठी भुरळ पाडणारी महानगरे अपघातांची आगारे बनत चाललेली आहेत. त्यामध्ये भारताची आर्थिक राजधानी असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मुंबई महानगरीचा पहिला क्रमांक असावा ही बाब नुसती धक्कादायकच नाही, तर राज्यकर्त्यांपासून प्रशासनकर्त्यांपर्यंत सर्वांची झोप उडवणारी आहे. गगनचुंबी इमारतींनी मुंबईचे आकाश व्यापलेले, रस्ते उड्डाणपुलांचे जाळे तयार झाले, समुद्रसेतू उभा राहिला तरीही मुंबई महानगरीतील रस्त्यांवरून लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अर्थात, मुंबईसह इतर शहरे आणि राज्यातील स्थिती फारशी वेगळी नाही. रस्ते अपघातांबाबत गेल्या चार महिन्यांतील समोर आलेली माहिती महानगरातील अपघातांचे भयाण वास्तव अधोरेखित करणारी आहे. राज्यातील एकूणच रस्ते अपघातात पैकी ४५ टक्के अपघात एकट्या मुंबई शहरात व्हावेत ही बाब धोरणकर्त्यांची चिंता वाढवणारी आहेच, शिवाय वाहनचालकांचा बेशिस्तपणा आणि बेफिकिरी अधोरेखित करणारी आहे.

राज्यातील एकूण रस्ते अपघातांपैकी ४५ टक्के अपघात एकट्या मुंबई शहरात झाल्याचे भयाण वास्तव परिवहन विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांत राज्यात एकूण १९ हजार ३८३ अपघात झाले. त्यामध्ये ५,३३३ प्रवाशांना प्राण गमवावे लागले तर ९,१२० प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी सर्वाधिक अपघात म्हणजे ८,७६८ अपघात एकट्या मुंबईत झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार महिन्यातील अपघातांच्या यादीत मुंबईचा क्रमांक पहिला आहे. त्यापाठोपाठ अहमदनगर (५५४), पुणे (५३९), नाशिक (५३६) आणि कोल्हापूर (४०६) यांचा क्रमांक आहे. जानेवारी ते एप्रिल २२ या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात रोज १६१ अपघात झाल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. मुंबईतील वाहनांची संख्या ४१ लाखांपेक्षा जास्त आहे आहे. त्यामध्ये २४ लाख दुचाकी, तर ११ लाख खासगी वाहने आहेत. याचाच अर्थ मुंबईमध्ये दर किलोमीटरमागे वाहनांची घनता ५७५ इतकी प्रचंड आहे. वाहनांची घनता लक्षात घेता मुंबईत फार वेगाने वाहने चालवणे काहीसे कठीण असले तरी मुंबईतील अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे.

खरंतर मुंबईची भौगोलिक स्थिती आणि मुंबईच्या सीमा लक्षात घेता मुंबई विस्तारण्याची क्षमता पुरती संपली आहे. मुंबई बेटाभोवती असणारा समुद्र लक्षात घेता मुंबईचा भूभाग अजून वाढवणे अशक्‍य आहे. त्यामुळे मुंबईचा क्षेत्रफळाचा विचार करता मुंबईतील रस्ते आणि वाहने यांना सामावून घेण्याची मुंबईची क्षमता कधीच संपलेली आहे. तरीदेखील मुंबईत दिवसागणिक हजारो वाहनांची भर पडतच आहे. त्यासाठी मुंबईतील रस्त्यांवर जागोजागी उड्डाणपूल बांधून रस्त्यांचे जाळे अधिकाधिक विणण्याचे काम अहोरात्र सुरूच आहे. कोणत्याही शहरातील, राज्यातील रस्ते हे त्या शहराच्या, राज्याच्या विकासाचे, प्रगतीचे महामार्ग ठरतात. याविषयी दुमत असण्याचे कारण नाही; परंतु प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली आहे. मुंबईत रस्ते, वाहने या सर्वांनी मर्यादा कधीच ओलांडली आहे. त्यामुळे रस्ते अधिक वाढविणे केवळ अशक्यच असले तरी वाहनांच्या संख्येवर काहीसे नियंत्रण आणत वाहनचालकांकडून नियमांचे काटेकोर पालन होईल याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास वाढत्या अपघातांना काहीसा पायबंद घालता येईल.

रस्ते अपघातांना यांत्रिक दोषाबरोबरच मानवी चुका अधिकाधिक कारणीभूत आहेत. या बरोबरच रस्त्यांची दुर्दशा आणि रस्त्यावरील खड्डेदेखील मोठ्या प्रमाणात अपघातास कारणीभूत ठरत आहेत. मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेली प्रकल्पांची कामे व त्यात सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन याकडे होत असलेले दुर्लक्ष अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. दक्षिण मुंबई हे वित्तीय आणि व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र असल्याने दक्षिण मुंबईवरील भार वाढत चालला आहे. दक्षिण मुंबईवरील भार कमी करण्याच्या कितीही घोषणा झाल्या असल्या तरी अजूनही त्याला यश आलेले नाही. त्यामुळे अजूनही लाखो लोक उत्तर ते दक्षिण असा प्रवास करतात. त्यामुळे विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होते. या दोन्ही मार्गांवर मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अडथळे उभे करण्यात आलेले आहेत. मुंबईतील रस्ते वर्षाच्या बाराही महिने या ना त्या कारणाने नेहमीच खोदलेले असतात. त्यातच मुंबईतील जवळजवळ सर्वच सिग्नल जवळील रस्ते एक तर खोदलेले वा खड्ड्यांनी भरलेले आहेत. त्यामुळे सिग्नल जवळील रस्ते मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूककोंडीस कारणीभूत ठरत आहेत. सिग्नल जवळ जास्त वेळ थांबण्याची अनेक वाहनचालकांची मानसिकता नसते. त्यातच अनेक जण सिग्नल सुटण्याच्या आधीच जाण्याचा प्रयत्न करतात. आधीच प्रचंड गर्दी, त्यात सिग्नल जवळील खड्डेयुक्त रस्ते, मोठ्या प्रमाणात अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे मुंबईतील सर्व सिग्नल जवळील रस्ते खड्डेमुक्त असावयास हवे हे सर्वसामान्य माणसाला कळते ते रस्त्यांची जबाबदारी असणाऱ्यांना कळत नाही असे कसे म्हणता येईल? जे मुंबईचे दुःख आहे तेच राज्यातील अन्य महानगरांचे आहे. राज्यात खड्डेमुक्त रस्ते तयार केले तर अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. रस्ते अपघातांची कारणे ही मुख्यत्वे दोन प्रकारची आहेत, एक म्हणजे रस्त्यांची दुर्दशा आणि चांगले रस्ते तयार करण्याबाबत केली जाणारी अक्षम्य हेळसांड, तर दुसरे म्हणजे वाहनचालकांची बेफिकिरी, बेशिस्त आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणे ही होय. अर्थात, दोन्ही कारणांना मर्यादा घालणे शक्य आहे. त्यासाठी गरज आहे ती जबर इच्छाशक्तीची!

खरं तर पावसाळा सुरू होण्यापूर्वीची ही अपघातांची आकडेवारी आहे. पावसाळ्यातील रस्त्यांच्या दुर्दशेबाबतच्या कथा आणि व्यथा मनाला चटके लावणाऱ्या आणि मनस्ताप देणाऱ्या असतात आणि आहेत. तरीदेखील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे का व्हावे? दरवर्षी नवीन रस्तेबांधणी आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालून देखील लोकांना चांगले रस्ते का मिळत नाहीत? त्यामुळे हेच खड्डेयुक्त रस्ते मोठमोठ्या अपघातास आणि आणि निष्पाप जीवांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरत आहेत. मुंबई याला अपवाद नाही. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असले तरी रस्त्यावरील खड्डे मुंबईच्या पाचवीला पुजलेले आहेत.

जी महानगरी राज्याची राजधानी आहे, जेथे राज्याच्या विकासाचे भाग्यविधाते अर्थात धोरणकर्ते बसलेले आहेत, त्या महानगरीत रस्त्यांची दुर्दशा आणि अपघात यांचे प्रमाण लक्षणीय असेल, तर राज्यातील इतर महानगरांसह संपूर्ण राज्याची स्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी. जेथे रस्ते बरे आहेत, तेथे रस्त्यांवर सूचना फलकच नाहीत. किती ठिकाणी रस्त्यांवर स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत; परंतु तेथे ‘येथे गतिरोधक आहे’ असे सांगणारे फलकच नाहीत आणि स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टेदेखील नाहीत, मग अशा ठिकाणी अपघात होणार नाहीत तर काय होणार? आता हेही सारे जनतेने सांगायचे काय? किमान सोई-सुविधा उपलब्ध करून देणे ही रस्ते कर वसूल करणाऱ्यांची जबाबदारी नाही काय? अपघात रोखण्यासाठी अपघातांना कारणीभूत ठरणारी कारणे रोखणे व काही कारणे कायमस्वरूपी संपविणे शक्य आहे; परंतु तशी सर्व संबंधितांची इच्छा असायला हवी ना!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in