एटीएममध्ये झाला चमत्कार पाचशे रुपये टाकले की अडीच हजार रुपये निघायचे

विशेष म्हणजे या एटीएमवर पैसे काढल्यानंतर बँकेतून मोबाइलवर कोणताही मेसेज संबंधितांना आला नाही
एटीएममध्ये झाला चमत्कार पाचशे रुपये टाकले की अडीच हजार रुपये निघायचे

एखाद्या मांत्रिकाने पैसे किंवा सोने दुप्पट करुन देण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अर्थात त्यात लोकांची फसवणूकच झाली आहे. अशाच प्रकारे नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा गावातील एटीएममध्ये चमत्कार पाहायला मिळाला. ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी पाचशे रुपयांचा आकडा टाकला की, ते पैसे निघायचेच. सोबतच त्यानंतर जास्तीचे अडीच हजार रुपये बाहेर यायचे. त्यामुळे या एटीएमवर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली.

खापरखेडा गावातील शिवा कॉम्प्लेक्समध्ये अ‌ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी पाचशे रुपये काढले की, ती रक्कम निघायचीच. सोबतच इतर अडीच हजार रुपये निघायचे. असा प्रकार घडत असल्याचे खबर सगळीकडे पसरली. त्याचा फायदा अनेकांनी घेत पैसे काढले. विशेष म्हणजे या एटीएमवर पैसे काढल्यानंतर बँकेतून मोबाइलवर कोणताही मेसेज संबंधितांना आला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लेवाडा येथील एक तरुण एच.डी.एफ.सी.च्या एटीएममधून दहा हजार रुपये काढून परत जात होता. तेव्हा कोराडी येथील एक युवक त्याच्याजवळ आला. त्याने त्याला ५०० रुपये मागून १ हजार रुपये देतो, असे सांगितले. तरुणानेही त्याला पैसे दिले. यानंतर तो युवक एटीएममधून अडीच हजार रुपये घेऊन आला आणि तरुणाने त्यातील हजार रुपये दिले. त्याने सर्व प्रकार सांगून पैसे काढून दाखविले.

खापरखेड्यातील एटीएमवरून अनेकांनी पैसे काढले. त्यानंतर या एटीएमचा प्रकार सर्वदूर पसरला. पहाटे तीन वाजता नागपूर, कोराडी आणि खापरखेडा परिसरातील युवकांनी एटीएमकडे पैसे काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला.

बँक अधिकारी म्हणतात...

पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी बुधवारी तेथे पोहोचून एटीएमची तपासणी केली. दरम्यान किती नागरिकांनी अशाच पद्धतीने पाचशे रुपयांचे विड्रॉल टाकून अडीच हजार रुपये नेले आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, पैसे काढणाऱ्या एटीएमधारकांचा डाटा काढून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in