- सूर्यकांत आसबे
सोलापूर : धाराशिव लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध पाटील यांच्यात पारंपरिक लढत होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून शिवसेनेच्या मशालीला त्या थेट भिडणार असल्याचे बोलले जात आहे.
धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडी करून शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी अंतिम झाली आहे. तर महायुतीकडून माजी मंत्री बसवराज पाटील, सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, आमदार विक्रम काळे अशा मंडळींच्या नावानंतर आता धाराशिवचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी तसेच जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकमेकांचे पारंपरिक विरोधक पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर यांची लढत रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
मतदारसंघ खुला झाल्यानंतर होत असलेली ही चौथी निवडणूक असून त्यापैकी तीन निवडणुकांमध्ये एकदा राष्ट्रवादी तर दोनदा शिवसेनेला लोकसभा जिंकता आली. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरले. त्यांनी शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचा पराभव केला होता. २०१४ साली मोदी लाटेत डॉ. पाटील यांना रवींद्र गायकवाड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. २०१९ मध्ये खासदार असलेल्या गायकवाड यांना डावलून ओमराजे यांना उमेदवारी दिली व पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आमदार राणा जगजीतसिंह हे ओमराजे यांच्या विरोधात उभे ठाकले होते.
तत्पूर्वी झालेल्या दोन विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांना आव्हान दिले होते. २००९ साली शिवसेनेचे ओमराजे यांनी आमदार राणा जगजीतसिंह यांचा पराभव केला.तर २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पराभवाचे उट्टे काढले होते. त्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा हे दोघे लोकसभा निवडणुकीत एकमेकांना आव्हान देण्यासाठी उतरले.
औसा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे ओमराजे यांचा विजय सोपा झाला आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत असलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील पहिल्याच लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर आता चौथ्यांदा हे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.