वडिलांच्या आधी आता ‘आई’चं नाव लागणार! राज्यात चौथ्या महिला धोरणाला मंजुरी

अजित पवारांच्या या टीकेला शरद पवारांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. “आम्ही जे केले, ते बंड नव्हते.
वडिलांच्या आधी आता ‘आई’चं नाव लागणार!
राज्यात चौथ्या महिला धोरणाला मंजुरी

पुणे : संपूर्ण नाव घेताना, स्वत:चे नाव... नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव घेतले जाते. पण आता हा नियम बदलला जाणार आहे. कारण वडिलांच्या आधी आता आईचे नाव लावावे लागणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने चौथे महिला धोरण आणले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान दिली.

राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार आहे. राज्यात चौथे महिला धोरण आणून महिलांचा सन्मान केला जाणार असून वडिलांच्या नावाआधी आता आईचे नाव लावले जाईल, असे अजित पवार म्हणाले. “महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, अनेक जण आपल्या नावानंतर आईचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावताना दिसतात. काही जण वडिलांचे नाव न लावता फक्त आईचेच नाव लावतात. काही जण मंत्रीपदाची किंवा आमदारकीची शपथ घेताना, काही नवीन युवा आमदारांनीही आधी आईचे नाव घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, महिलांचा, आईचा अशाप्रकारे सन्मान केला जात असल्याची बाब उल्लेखनीय आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी ही धोरणात्मक बाब जाहीर केली.

इथून पुढे माझं ऐका -अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारातमती दौऱ्यादरम्यान शरद पवारांवर राजकीय टोलेबाजी केली. “इथून पुढे माझं ऐका. कुणाचेही ऐकू नका. मी वयाच्या ६०व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी तर ३८व्या वर्षीच घेतला होता. वसंतदादांचं चांगलं चाललं असताना त्यांनी बंड केलं होतं,” अशा शब्दांत अजितदादांनी नाव न घेता होम पीचवरून थेट काकांनाच लक्ष्य केले.

आम्ही केले ते बंड नव्हते -शरद पवार

अजित पवारांच्या या टीकेला शरद पवारांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. “आम्ही जे केले, ते बंड नव्हते. आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला. त्याबद्दल कुणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केलं असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही. फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहित आहे. त्यामुळं त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. गेली १० ते १५ वर्षे बारामती आणि त्या भागात मी कधी लक्ष घातलेले नाही. पक्ष म्हणून मी नेहमी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली. बाकी कुणी कुणाचं ऐकावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,” असा टोलाही शरद पवार यांनी अजितदादांना हाणला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in