शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; बीडमधून बजरंग सोनावणे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने गुरुवारी दुसरी यादी जाहीर केली असून भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता होती. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. २०१९ मध्ये बीडमध्ये भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात बजरंग सोनवणे यांनी निवडणूक लढवून जोरदार लढत दिली होती.
भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस अतिशय आग्रही होती. सांगली व भिवंडी या दोन जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे काँग्रेसचे नेते सांगत होते. सांगलीत आधीच शिवसेनेच्या ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून, याबाबत आता चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून काही लोकांनी येथे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे सूचित केल्यानंतर तसे झाले तर राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने भिवंडीचा उमेदवार जाहीर करून विषयच कट केला आहे. शरद पवार गटाने सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली असून, भिवंडीत आता केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांच्यात लढत होणार आहे.