लाडक्या बहि‍णींची अब्रू वाचवण्याची गरज! शरद पवारांचा महायुतीवर निशाणा

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली.
शरद पवार
शरद पवार
Published on

धुळे : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रात गुंडगिरीचे राज्य असून, सत्तेचा गैरवापर सुरू आहे. कारखाने, सहकार चळवळी यांच्यासाठी या सरकारने काहीही काम केले नाही. तसेच रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या नाहीत. मागच्या १० वर्षांत देशाचा विकास झालेला नाही. हे सरकार आता बहिणींना दरमहा १५०० रुपये देत आहे. पण लाडक्या बहिणींची अब्रू कोण वाचवणार? बहिणींचा सन्मान राखला गेला पाहिजे, पण त्याकडे या सरकारचे मुळीच लक्ष नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी महायुतीवर टीका केली.

धुळ्यातील शिंदखेडा येथे शेतकरी मेळावा पार पडला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, “मी १० वर्षं कृषिमंत्री म्हणून काम केले आहे. त्यावेळी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी यांच्याविषयी काहीही आस्था नाही. शेतीसंदर्भातील योग्य धोरण राबवले जात नाही. मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली. कांद्याला चांगला भाव मिळाला नव्हता. कांदा उत्पादक शेतकऱ्याने कष्टाने पीक घेतले. त्यानंतर निर्यातबंदी करण्यात आली. गहू, तांदूळ याबाबतीतही तेच घडले. जे पिकवाल त्या धान्यावर, उत्पादनावर निर्यात बंदी. मोदी सरकारचे धोरणच शेतकरीविरोधी आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

सरकारला सत्तेचा माज!

सत्तेचा माज सरकारच्या डोक्यात गेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीचा विचार दिला. मात्र, या लोकांना सत्तेचा माज आला आहे. सध्या राज्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे. ती सत्ता उद्या संधी मिळाल्यानंतर त्यांच्या हातातून काढून घेणे आणि महाविकास आघाडीच्या हातात देणे हे काम तुम्हाला करायचे आहे. खड्यासारखे या लोकांना बाजूला करा. एवढेच नाही, तर एकदा आमच्या हाती सत्ता द्या. महाराष्ट्राचा चेहरा तुम्हाला बदललेला दिसेल, अशी खात्री मी तुम्हाला देतो, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in