‘सीईटी’ परीक्षेच्या तारखेत बदल करा; आ.सतीश चव्हाण यांची मागणी

सीईटी-पीसीएमच्या विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता याव्यात यासाठी सीईटी-पीसीएमची परीक्षेच्या तारखेत बदल करून सदरील परीक्षा ९ मेनंतर घेण्यात यावी, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.
‘सीईटी’ परीक्षेच्या तारखेत बदल करा; आ.सतीश चव्हाण यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी ‘नीट’ परीक्षा ५ मे रोजी होणार असून शासनाच्या राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) माध्यमातून २ ते १६ मे या कालावधीत अभियांत्रिकी, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी आदी अभ्यासक्रमांसाठी सीईटी-पीसीएम या विषयाची परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने सीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करा, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांच्याकडे केली.

शासनाच्या राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) माध्यमातून अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी आदी व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी नीट ची परीक्षा ही ‘नाटा’ मार्फत घेण्यात येते. ‘नीट’ परीक्षेची तारीख पूर्वीच जाहीर झालेली असून ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर ५ मे रोजी घेण्यात येणार आहे. ‘नीट’च्या परीक्षांचे केंद्र ही ठराविक जिल्हास्तरावर आहेत. अभियांत्रिकी, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी आदी अभ्यासक‘मांसाठी सीईटी-पीसीएम या विषयाची परीक्षा २५ ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी-पीसीएम परीक्षा आता २, ३, ४, ५, ९, १०, १, १५, आणि १६ मे रोजी होणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन परीक्षा कशा द्यायच्या असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांना पडला आहे. सीईटी-पीसीएमच्या विद्यार्थ्यांना कुठली तरी एकच परीक्षा देता येणार असून एका परीक्षेपासून वंचित राहावे लागणार असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी निवेदनाव्दारे मंत्र्यांना सांगितले.

त्यामुळे सीईटी-पीसीएमच्या विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता याव्यात यासाठी सीईटी-पीसीएमची परीक्षेच्या तारखेत बदल करून सदरील परीक्षा ९ मेनंतर घेण्यात यावी, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in