नागपूर/मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या आलिशान गाडीने सोमवारी मध्यरात्री चार-पाच वाहनांना धडक दिल्यानंतर या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांच्या तपासाविषयी साशंकता व्यक्त करतानाच, नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. बावनकुळे यांच्या मुलावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही वा त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नाही. याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवरून चंद्रशेखर बावनकुळे यांना विरोधकांनी लक्ष्य करणे योग्य नाही, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या गाडीचा चालक अर्जुन हावरे याला पोलिसांनी अटक करून त्वरित जामीनही मंजूर केला. अपघात घडला त्यावेळी संकेत याच्यासह पाच जण गाडीत होते, मात्र संकेत गाडी चालवत नव्हता, असा दावा पोलिसांनी केला आणि त्यानंतर गाडीचालक अर्जुन हावरे याला अटक करून जामीन मंजूर केला. याप्रकरणी बेदरकारपणे गाडी चालविण्यासह अन्य गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
संकेत आणि त्याचे मित्र धरमपेठ परिसरातील एका बीयर बारमधून परतत असताना हा अपघात घडला. गाडीतील सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण आहे का, या तपासणीचाही त्यामध्ये समावेश असेल. या अपघाताचा घटनाक्रम समोर यावा यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात घडला तेव्हा बावनकुळे यांचा मुलगाच गाडी चालवत होता आणि या घटनेतील पुरावा नष्ट करण्यात आला, असा दावाही राऊत यांनी केला आहे. सदर प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्नही झाला. जोपर्यंत फडणवीस हे गृहमंत्री आहेत तोपर्यंत राज्यातील एकाही प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होणार नाही, असा आरोपही राऊत यांनी केला.
राऊत यांचे आरोप
अपघात घडला तेव्हा संकेत याने मद्यप्राशन केले होते. त्याच्या गाडीने सहा वाहनांना धडक दिली. त्यामध्ये चार जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
एफआयआरमध्ये संकेत याचे नाव नाही, गाडीच्या क्रमांकाचा फलक अपघातानंतर काढून टाकण्यात आला.
बावनकुळे यांच्या मुलाने अन्य वाहनांना दोनदा धडक दिली, मात्र नेहमीप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज काढून टाकण्यात आले.
गाडी बावनकुळे अथवा संकेत याच्या नावावर नोंदणी केलेली असेल तर क्रमांकाचा फलक काढून टाकण्याची गरजच काय?
अपघात घडला तेव्हा संकेत गाडी चालवत होता, मात्र त्यानंतर अन्य व्यक्ती वाहन चालवत असल्याचे दर्शविण्यात आले.
जोपर्यंत फडणवीस गृहमंत्री आहेत आणि रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक आहेत तोपर्यंत कोणत्याही प्रकरणाचा योग्य तपास होणार नाही.
संकेतविरुद्ध अद्यापही कारवाई नाही
बावनकुळे यांचा मुलगा संकेत आणि गाडीतील अन्य दोघांविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अन्य दोघेजण माणकपूर पुलावरून पसार झाल्याचे कळते. संकेत याच्या आलिशान गाडीने जितेंद्र सोनकांबळे यांच्या गाडीला धडक दिली त्याची तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर बेदरकारपणे गाडी चालविणे आणि अन्य गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आलिशान गाडीतील चौघेजण मद्यप्राशन करून येत होते तेव्हा अपघात घडला. आम्ही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहोत. त्यानंतर गाडीतील अन्य व्यक्तींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.
दोषींवर कारवाई होईल - दानवे
या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, ज्या गाडीने अनेक वाहनांना धडक दिली. ती गाडी संकेत बावनकुळे याच्या नावावर होती आणि अपघाताच्या वेळी संकेत गाडीतच होता ही वस्तुस्थिती आहे, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य करणे अयोग्य - फडणवीस
बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अनेक वाहनांना धडक दिली, त्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य करणे योग्य नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे सांगितले. या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत आणि एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तथापि, विरोधी पक्ष ज्या पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य करीत आहेत ते योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले.
गृह खाते सांभाळण्यास फडणवीस अकार्यक्षम
राज्याचे गृह खाते सांभाळण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम नसल्याची टीका शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या आलिशान गाडीने अन्य वाहनांना धडक दिल्याचा प्रकार घडल्यानंतर राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.