अशोक चव्हाण यांना होणारा विरोध राजकीय; भाजप प्रवक्ते गणेश हाके यांचा निर्वाळा

विरोधक आम्हाला जातीवादी म्हणून संबोधतात, खरे जातीवादी कोण हे यांच्या यादीवरून पाहावे. जात, धर्म पाहून उमदेवारी देत आहेत, हा निवडणूक विभागाकडे विषय केला जाईल, असेही गणेश हाके यांनी सांगितले.
अशोक चव्हाण यांना होणारा विरोध राजकीय; भाजप प्रवक्ते गणेश हाके यांचा निर्वाळा

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा आंदोलकांकडून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांना झालेला विरोध हा राजकीय आहे. त्यांना होणाऱ्या विरोधाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही, असा निर्वाळा भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी बुधवारी नांदेड येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयात ३ एप्रिलपासून सहा दिवस राबविण्यात येणाऱ्या बुथ विजय अभियानाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष देविदास राठोड, रिपाईचे धम्मपाल दुथाडे, महानगराध्यक्ष प्रवीण साले, किशोर स्वामी यांची उपस्थिती होती. हाके म्हणाले की, अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. त्याचा फायदा प्रताप पाटील चिखलीकर यांना होणार असून, मागील लोकसभा निवडणुकी पेक्षाही दोन -अडीच लाख अधिक मताधिक्यांनी ते निवडून येतील. तसेच गुरुवारी (दि. ४) प्रताप पाटील चिखलीकर हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी जुना मोंढा भागातून मिरवणूक काढून नंतर गुरूद्वारा मैदानावर सभा होणार आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीष महाजन, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह मित्रपक्षातील प्रमुख नेते यांची उपस्थिती राहणार आहेत, असे हाके यांनी सांगितले.

वंचितवर टीका

तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारांची जातीनिहाय यादी जाहीर करण्यात आली, यावर हाके म्हणाले की, विरोधक आम्हाला जातीवादी म्हणून संबोधतात, खरे जातीवादी कोण हे यांच्या यादीवरून पाहावे. जात, धर्म पाहून उमदेवारी देत आहेत, हा निवडणूक विभागाकडे विषय केला जाईल, असेही गणेश हाके यांनी सांगितले.

'त्या' पक्षाचा अंतर्गत प्रश्न

दरम्यान, भाजपमध्ये गटातटाचे राजकारण होत असल्याचे सोशल मीडीयावरील पोस्टवरून दिसून येते यावर गणेश हाके म्हणाले, असे वातावरण निवडणूकीपूर्वी असते. तसे होत असेल तर, कोण काय करते, कोणाच्या गाडीत जाऊन बसतो, याची भाजपकडे नोंद आहे. कोणालाही माफी नाही. तसेच वाशीम, हिंगोलीतील शिंदेसेनेतील उमेदवारी बदल हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, असे हाके म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in