SSC Results : दहावीचा भरघोस निकाल, मुलींची सरशी कायम

कोकणचा सर्वाधिक ९९.२७ टक्के निकाल लागला आहे. तर, सर्वांत कमी निकाल नाशिक विभागाचा ९५.९० टक्के लागला आहे
Representive Image
Representive ImageANI

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९६.९४ टक्के इतका लागला. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी १.६४ ने जास्त आहे. राज्यात १२२ मुलांना पैकीच्या पैकी म्हणजे शंभर टक्के गुण मिळाले आहेत. विभागनिहाय निकालात कोकणचा सर्वाधिक ९९.२७ टक्के निकाल लागला आहे. तर, सर्वांत कमी निकाल नाशिक विभागाचा ९५.९० टक्के लागला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल घोषित केला.

दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ८४ हजार ७९० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ इतकी आहे.

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ७९.०६ टक्के लागला आहे. एकूण ५४ हजार १५९ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२ हजार ३५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ४१ हजार ३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ इतकी आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्क्यांनी जास्त आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे. सन २०२१ मध्ये कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. २०२१ चा एकूण निकाल ९९.९५ टक्के, तर मार्च २०२० मध्ये ९५.३० टक्के निकाल लागला.

यंदा ८३ हजार ६० विद्यार्थ्यांना ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तसेच, १ लाख ६४ हजार ७८ विद्यार्थ्यांनी सवलतीच्या गुणांचा लाभ घेतला आहे. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २१ हजार ५३० इतकी असून २० हजार ५९८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे. यापैकी १७ हजार ३५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८४.२३ इतकी आहे. राज्यातील २२ हजार ९२१ माध्यमिक शाळांपैकी १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच २९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यासाठी तारीख स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार आहे. ऑनलाइन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. गुणपडताळणीसाठी अर्ज करायची मुदत २० जून ते २९ जूनपर्यंत आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये इतके शुल्क ऑनलाइन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागेल. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी २० जून ते ९ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. पत्रकार परिषदेला सचिव डॉ. अशोक भोसले, सहसचिव माणिक बांगर आदी उपस्थित होते.

विभागनिहाय निकाल

कोकण - ९९.२७ टक्के,

कोल्हापूर- ९८.५० टक्के,

लातूर – ९७.२७ टक्के,

नागपूर- ९७ टक्के,

पुणे- ९६.९६ टक्के,

मुंबई- ९६.९४ टक्के,

अमरावती- ९६.८१ टक्के,

औरंगाबाद- ९६.३३ टक्के,

नाशिक- ९५.९०टक्के

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in