"मी राजकारणात आल्यापासून पक्ष बदलेला नाही..." अजित पवारांचं वक्तव्य; संजय राऊत म्हणाले, "त्यांनी काकांचा..."

अगदी पहिल्या दिवसापासून जनता हाच माझा पक्ष आहे, असं अजित पवार म्हणाले.
"मी राजकारणात आल्यापासून पक्ष बदलेला नाही..." अजित पवारांचं वक्तव्य; संजय राऊत म्हणाले, "त्यांनी काकांचा..."
Published on

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्वीटर) हॅण्डलवर आज एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवारांनी राज्यातील विविध मुद्द्यांना स्पर्श केला. मी राजकारणात आल्यापासून कोणताही पक्ष बदलेला नाही, अगदी पहिल्या दिवसापासून जनता हाच माझा पक्ष आहे, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित दादांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांनी पक्ष बदलला नाही, पण काकांचा पक्ष चोरला, असं संजय राऊत म्हणाले.

नेमकं काय म्हणाले अजितदादा?

अजित पवार यांनी एक्स हॅण्डलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं की, "मला फक्त इतकंच सांगायचं आहे, या लोकांमध्ये आणि तुमच्या अजितदादांमध्ये हाच फरक आहे, की ते राजकारण करणारे आहेत आणि तुमचा दादा काम करणारा आहे. अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे मी राजकारणात आल्यापासून कोणताही पक्ष बदलेला नाही, पार्टी बदलेली नाहीये. अगदी पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष आहे, मी पूर्वीही जनतेचा होतो आणि आताही जनतेचा आहे. मी जे काही करतो, त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो."

अजित दादांनी काकांचा पक्ष चोरला-

मी आजपर्यंत कधीच पक्ष बदलला नाही, या अजित पवार यांच्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "त्यांनी (अजित पवार) पक्ष बदलला नाही पण काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे. त्यांनी सरळ सरळ केलेलं पक्षांतर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते, तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता तर बाळासाहेबांची शिवसेना धनुष्यबाणासह एकनाथ शिंदे यांना मिळाली नसती."

logo
marathi.freepressjournal.in