"...आज त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटलाय", शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

यापूर्वी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी स्थापन एसआयटी चौकशीवरून आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. त्यावरून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते.
"...आज त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटलाय",  शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर 10 जानेवारी रोजी निकाल दिला. यावेळी त्यांनी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्यावर शिक्कामोर्तब केले. यानंतर काल(16 जानेवारी) रोजी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी वरळी येथे महापत्रकार परिषद घेत हा विषय जनतेच्या न्यायालयात मांडला. नार्वेकरांनी दिलेल्या निकालावरुन वादविवाद सुरु असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

"आज एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. ज्या माणसामुळे शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना बाहेर पडावं लागलेलं, आज त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटलाय", असा टोला शर्मिला ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना लगावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी 'एक्स'वर याबाबतची पोस्ट केली आहे.

आदित्य ठाकरेंची केली होती पाठराखण-

मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी डिसेंबरमध्ये दिली होती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी स्थापन एसआयटी चौकशीवरून आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. त्यावरून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीवर बोलताना त्यांनी, "आदित्य असे काही करेल, असे मला वाटत नाही. चौकशा कुणीही कुणाच्या लावू शकतो. आम्ही पण याच्यातून खूप गेलो आहोत”, असे वक्तव्य केले होते. शर्मिला ठाकरे यांनी आदित्य यांची पाठराखण केल्याने ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता ही दरी परत वाढल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in