पाचही मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट ; शिंदे गटाचा एकही उमेदवार नाही

सोमवारी सकाळपासून शुभांगी पाटील नॉट रिचेबल होत्या. शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची चर्चा
पाचही मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट ; 
शिंदे गटाचा एकही उमेदवार नाही

राज्यात होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक-पदवीधर निवडणुकांच्या उमेदवारीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती, अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. विशेषतः नाशिक पदवीधरमध्ये कुणात लढत होणार याबाबत उत्सुकता होती. अखेर तीन वाजेपर्यंत शुंभागी पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही. मात्र, भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतल्यामुळे नाशिकमध्ये सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी थेट लढत होणार आहे. मात्र, पाचही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा स्वतःचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा नाही.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील

सोमवारी सकाळपासून शुभांगी पाटील नॉट रिचेबल होत्या. शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. त्यामुळे शुभांगी पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशीही अफवा पसरली होती. परंतु, ही शक्यता फोल ठरली. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली होता. त्यामुळे सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले यांच्यामध्ये लढत होईल. सोमवारी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.

नागपूर शिक्षक मतदारसंघात नागो गाणार विरुद्ध आडबोले

नागपूर शिक्षक मतदारसंघातही अनेक नाट्यमय वळणे पाहायला मिळाली. नागपूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने गंगाधर नाकाडे यांना मैदानात उतरवले होते. मात्र, गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला. नागपूरमध्ये भाजपचे वर्तमान आमदार नागो गाणार आणि काँग्रेसच्या सुधाकर आडबोले यांच्यात आता थेट लढत होईल. मात्र, यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता २२ उमेदवार रिंगणात आहेत.

अमरावती पदवीधर मतदारसंघात धीरज लिंगाडे विरुद्ध रणजित पाटील

अमरावती पदवीधर मतदारसंघात अमरावतीची जागा महाविकास आघाडीमधील काँग्रेसने मिळवली आहे. काँग्रेसकडून धीरज लिंगाडे आणि त्यांच्याविरोधात भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील अशी लढत होणार आहे. शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले असून एकूण २३ उमेदवार रिंगणात उतरले होते.

कोकण शिक्षक मतदारसंघात बाळाराम पाटील विरुद्ध ज्ञानेश्वर म्हात्रे

कोकण शिक्षक मतदारसंघातून शेकापचे नेते व विद्यमान आमदार बाळाराम पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे आणि महाविकास आघाडीनेही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीत उतरले आहेत. या मतदारसंघात एकूण ८ उमेदवार मैदानात उतरले आहेत.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे विरुद्ध किरण पाटील

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे. विद्यमान आमदार विक्रम काळे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले किरण पाटील यांना निवडणुकीत उतरवले आहे. काळे यांनी याआधी दोन टर्म काम केल्यामुळे त्यांना ही निवडणूक तशी अवघड नाही. औरंगाबादमध्ये १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकाने अर्ज मागे घेतल्याने १४ उमेदवार रिंगणात आहेत.

आता या पाचही मतदारसंघात ३० जानेवारीला मतदान होणार आहे. तर मतमोजणी २ फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणुकीतील शह - काटशहामुळे निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, कोण बाजी मारणार हे आता २ फेब्रुवारीलाच कळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in