
नागपूर : येथील विमानतळावरील बोर्डिंग गेट परिसरात एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा वैमानिक नागपूरहून पुण्याला इंडिगो कंपनीचे विमान घेऊन जाणार होता, मात्र विमानात बोर्ड होण्यापूर्वीच ते बोर्डिंग गेटजवळ कोसळले. कॅप्टन मनोज सुब्रम्हण्यम असे मृत्यू झालेल्या विमानाच्या पायलटचे नाव आहे.
इंडिगो कंपनीचे विमान नागपूरहून पुण्यासाठी उड्डाण घेणार होते. त्यासाठी कॅप्टन मनोज सुब्रम्हण्यम हे निघाले असताना बोर्डिंग गेटजवळ अचानक कोसळले. विमानतळावरील ग्राऊंड स्टाफच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत्यूचे प्राथमिक कारण हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचा अंदाज आहे.
पायलटच्या रोस्टरनुसार, ड्युटीवर येण्यापूर्वी कॅप्टन मनोज यांनी विविध क्षेत्रात विमानांचे उड्डाण केले. त्याशिवाय, २७ तासांची विश्रांतीही घेतली. पायलटने आदल्या दिवशी त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर असे दोन सेक्टर चालवले. पहाटेच्या (अंदाजे पहाटे ३ ते सकाळी ७ दरम्यान) सुमारास विमानाचे सारथ्य केले. त्यानंतर कॅप्टन मनोज यांनी २७ तास विश्रांती घेतली. त्यानंतर ४ सेक्टरसाठी दुपारी १ वाजता प्रस्थान केले. नागपूरहून प्रस्थान होते. त्यांचे हे विश्रातीनंतरचे पहिले सेक्टर होते, अशी माहिती 'इंडिगो'च्या वतीने देण्यात आली आहे.
हवेतच वैमानिकाचा मृत्यू
मियामी (अमेरिका) मियामी ते चिली विमानप्रवासाच्या दरम्यान हवेतच एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली आहे. या विमानात त्यावेळी २७१ प्रवासी होते. लाटम एअरलाइन्सच्या ५६ वर्षीय वैमानिक इव्हान अंदौर यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. सॅंटियागोला जाणाऱ्या बोईंग ७८७-९ ड्रीमलायनर विमानात ही दुर्दैवी घटना घडली. विमानाने उड्डाण घेताच पहिल्या ४० मिनिटातच इव्हान यांना त्रास जाणवू लागला होता. त्यावेळी विमानातील नर्सने दोन डॉक्टरांच्या मदतीने त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की त्यात यश आले नाही. सह वैमानिकाच्या मदतीने या विमानाचे इमरजन्सी लॅंडींग करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना घडली.