पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

पाकिस्तानातील लाहोर येथून आपण सांगलीत आलो असून,आपण दहशतवादी आहोत.आपल्यासमवेत अन्य ५ व्यक्ती आहेत आणि आम्ही आमच्या जवळ असलेल्या आरडीएक्सने...
क्राईम न्यूज
क्राईम न्यूजTwitter

विशेष प्रतिनिधी

कराड :   पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सांगली,मिरज,सोलापूर आणि कोल्हापूर ही रेल्वे स्थानके बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा फोन सांगली पोलिसांना काही दिवसांपूर्वी आला होता.त्यामुळे या स्थानकांवर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र,पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत आरोपीच्या मुसक्या आवळण्याच यश मिळवले आहे.संबंधित रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा सचिन मारुती शिंदे नावाचा आरोपी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगावचा रहिवासी आहे. दरम्यान,आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.सांगली शहर पोलिसांनी मुंबई लोहमार्ग पोलिसांची मदत घेत आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ताब्यात घेत अटक केले.

गेल्या १३ मे रोजी वरील आरोपीने सांगली शहर पोलिसांना धमकीचा फोन केला होता.त्यावेळी आरोपीने पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूरची रेल्वे स्थानके बॉम्ब स्फोट करून उडवून देणार असल्याची धमकी दिली होती.सुरुवातील हा धमकीचा फोन मॉकड्रिल असल्याचा समज पोलिसांना झाला होता.मात्र,नंतर असे पुढे आले की,धमकीचा फोन खरोखरच आलेला होता. त्यानंतर सांगली शहर पोलिसांनी पूर्ण क्षमतेने तपासाला सुरूवात केली आणि आरोपी मुंबई सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरती असल्याचा तपास लावला.यानंतर सांगली पोलीसांचे एक पथक तातडीने मुंबईला रवाना झाले व सांगली पोलिसांनी मुंबई लोहमार्ग पोलिसांना संपर्क साधत त्यांच्या मदतीने आरोपीला अटक केली.

धमकीच्या फोनमुळे पोलीस दलात उडाली होती खळबळ :

पुण्यासह सांगली,मिरज,सोलापूर आणि कोल्हापूर ही रेल्वे स्थानके बाँबने उडवून देण्याची धमकी देणाऱ्यावर सांगली शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता.त्या संशयिताचे नाव रियाज कसाब असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते,मात्र नंतर तो सचिन मारुती शिंदे हाच असल्याचे स्पष्ट झाले.मात्र या एका फोनमुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती.रेल्वे प्रवासी आणि पोलिस प्रशासन यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.                              गेल्या सोमवारी १३ मे रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास सांगली शहर पोलिस ठाण्यास फोनची रिंग वाजली.ठाणे अंमलदाराने फोन उचलल्यावर पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने मी रियाज कसाब बोलत असल्याचे सांगितले. पाकिस्तानातील लाहोर येथून आपण सांगलीत आलो असून,आपण दहशतवादी आहोत.आपल्यासमवेत अन्य ५ व्यक्ती आहेत आणि आम्ही आमच्या जवळ असलेल्या आरडीएक्सने वरील पाच रेल्वे स्थानके उडविण्याची धमकी त्याने दिली.या फोनमुळे पोलिसांनी प्रचंड तारांबळ उडाली.अवघ्या दहा मिनिटांत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकावर धाव घेऊन तेथे सुमारे चार तास शोधमोहीम राबविली.पण यामुळे रेल्वेस्थानक परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.दुसरीकडे पोलिसांची आरडीएक्सची शोधमोहीम सुरू होती.रात्री उशिरापर्यंत पोलिस फौजफाटा परिसरात तैनात होता.मात्र तपासात पोलिसांना रेल्वे स्थानकावर काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही.त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने हा दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले.यावेळी अज्ञात व्यक्तीविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला होता.पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्यामुळे संशयित अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.अखेर त्याला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबतचा अधिक तपास सांगली शहर पोलीस करत आहेत. 

logo
marathi.freepressjournal.in