
न्यायालयाने वाहतूक पोलिसांना मोठा झटका दिला आहे. वाहतुकिचे नियम मोडणाऱ्या दुचाकीची चावी काढण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच दुचाकीस्वाराने ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यानंतर दंडवसुलीसाठी त्याला वाहतून पोलीस ठाण्यात येण्याची सक्ती करु शकत नसल्याचं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची सुनावणी दरम्यान दिलेल्या आदेशात न्यायालयाने हे म्हटलं आहे.
एका तरुणाला वाहतूक पोलिसांनी शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याच्या तसंच वाहतुकीचे नियम मोडल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या तरुणाची मुंबई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी दंडवसुलीमधील त्रुटींवर बोट ठेवत सत्र न्यायालयाने वाहतूक पोलिसांना मोठा झटका दिला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नाही. तसंच दुचाकीस्वाराने ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यानंतर दंडवसुलीसाठी त्याला पोलीस ठाण्यात येण्याची सक्ती करु शकत नसल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.
यावेळी सरकारी पक्षाने आपली बाजू मांडताना न्यायालयात सांगितले की, कुलाबा परिसरातील एन. एस. रोडवरील सिग्नलवर सागर पाठक हा तरुण विनाहेल्मेट दुचाकी चालवत होता. पोलीस जवळ येत असल्याचे दिसल्यावर त्याने हेल्मेट घातलं. यावेळी वाहतूक नियम मोडल्यामुळे पोलिसांनी तरुणावर दंडवसुलीची कारवाई केली. त्यावेळी तरुणाने कर्तव्य बजावत असलेल्या कॉन्स्टेबलवर हल्ला केल्याचा आरोप वाहतूक पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचा खटला मागील सहा वर्षापासून सत्र न्यायालयात सुरु होता.