कारागीर मिळत नसल्याने साखर गाठींचे उत्पादन घटले! अनेकांनी ठेवले उद्योग बंद; १५ टक्क्यांनी दर वाढले

रमजानचा महिना सुरू झाल्याने या काळात भट्टीवर गाठी तयार करण्यासाठी कारागिर मिळत नसल्याने अनेक उद्योग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा ठोक बाजारात भाव चांगला असला तरी, उत्पादनात घट असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारातील गाठींच्या दरवाढीवर झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
कारागीर मिळत नसल्याने साखर गाठींचे उत्पादन घटले! अनेकांनी ठेवले उद्योग बंद; १५ टक्क्यांनी दर वाढले
Published on

प्रतिनिधी/नांदेड : अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या होळी आणि येऊ घातलेल्या गुढीपाडव्यासाठी साखर गाठींच्या हारांनी बाजारपेठा सजल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साखर गाठीचे दर दहा ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. रमजानचा महिना सुरू झाल्याने या काळात भट्टीवर गाठी तयार करण्यासाठी कारागिर मिळत नसल्याने अनेक उद्योग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा ठोक बाजारात भाव चांगला असला तरी, उत्पादनात घट असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारातील गाठींच्या दरवाढीवर झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

नांदेडमधील चौफाळा भोई समाज व मुस्लीम समाज यांच्या १२ गाठी तयार करण्याचे उद्योग आहेत. महाशिवरात्रीपासून गाठी तयार करण्याची लगबग सुरू होते. एका उद्योगावर सहा कारागिर हे काम करतात. तर, काही जण कुटूंबातील सदस्यांची याकामी मदत घेतात. सध्या उन्हाचे चटके वाढले असून उष्ण अशा भट्टीवर गाठी तयार करण्यात येतात. त्यातच सध्या रमजान महिन्याला सुरूवात झाली असून, अनेक जण उपवास करतात. या काळात पाणीही ग्रहण करत नाहीत. अशा परिस्थ‍ितीत उष्ण भट्टीवर गाठी तयार करण्याचे काम अतिश्य कठिण आहे. कारागिरही काम करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे अनेकांनी उद्योग बंद ठेवले आहेत. यामुळे पूर्वी ६० क्विंटल उत्पादन तयार करणारे आज ४० क्विंटलवर आले आहेत. २० टक्यांनी ही घट झाली आहे, असे अखिल भारतीय भोई समाज सेवा संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जमदाडे यांनी सांगितले.

ठोक बाजारात ८० रुपये किलोचा दर

एक क्विंटल गाठी तयार करण्यासाठी सहा हजार ५०० रुपये खर्च येतो. यात मजुरीवर दोन हजार ५०० रूपये खर्च होतो. दिवसभरात दीड ते दोन क्विंटल गाठी तयार होते. पूर्वी मजुरीवर एक हजार ७०० रुपये खर्च होत होते. आता एका कारागिराला ५०० ते ६०० रुपये मजुरी द्यावी लागते. सध्या ठोक बाजारात ८० रुपये किलोचा दर आहे. परंतू, उत्पादन कमी असल्याचे चित्र आहे.

गाठींचे विविध प्रकार

किरकोळ बाजारात साखर गाठींचे विविध प्रकार विक्रीसाठी आले आहेत. यात जावाई हार (एक नग) ११० रुपये तर, १०० ते १२० रुपये किलोमध्ये लहान, मोठ्या पदकांची गाठी विक्रीस आहे. तर, खारीक-खोब-यांचे तीन प्रकारचे हार आहेत. यात जावाई हार (एक नग) १५० रुपये, पिवळी खारीक हार ३०० रुपये, साधारण खारीक हार २०० रुपयाला (एक नग) विक्रीस उपलब्ध आहे. उत्पादन कमी असल्याने गतवर्षीच्या तुलनेत दहा ते १५ टक्यांनी दर वाढले आहेत, असे विक्रेते गिरिष चक्रवार यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in