ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा खालावलेलाच; पाचवीतल्या विद्यार्थ्यांना वाचता येईना...

राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा असर २०२४ हा अहवाल आज जाहीर करण्यात आला.
ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा खालावलेलाच; पाचवीतल्या विद्यार्थ्यांना वाचता येईना...
Published on

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा असर २०२४ हा अहवाल आज जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीतील मजकूर वाचता येत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. तसेच आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुमार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

देशातील ग्रामीण भागातील ३ ते १६ वर्ष वयोगटातील मुलांची शालेय नोंदणी, त्यांचे मूलभूत वाचन आणि अंकगणित कौशल्ये याबाबत प्रथम संस्था दर दोन वर्षांनी अहवाल सादर करते. त्यानुसार आज असर अहवाल जाहीर करण्यात आला. देशातील ६०५ ग्रामीण जिल्ह्यातील १७ हजार ९९७ गावांमधील ६ लाख ४९ हजार ४९१ विद्यार्थ्यांचा सर्वे करण्यात आला. २०२२ च्या अहवालाच्या तुलनेत देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सुधारणा दिसून आली आहे. गेल्या अहवालाच्या तुलनेत राज्यातील शिक्षणाची स्थिती यंदाच्या अहवालामध्ये काही घटकांमध्ये सुधारली असली तरी ती समाधानकारक नसल्याचे दिसते.

पाचवीच्या ५९.६ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीतील अभ्यासक्रमाचा मजकूर वाचता येत असल्याचे समोर आले आहे. तर आठवीच्या ७४.३ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीतील अभ्यासक्रमाचा मजकूर वाचता येतो. २०२२ च्या अहवालात हीच आकडेवारी ७६.१ टक्के होती. यामध्ये घट झाल्याचे यावेळी दिसत आहे.

पाचवीतील २७.६ टक्के विद्यार्थ्यांनाच भागाकार येत आहे. तर अनुदानित शाळेतील २६.१ टक्के आणि खासगी शाळेतील २९.८ टक्के विद्यार्थ्यांनाच भागाकार करता येत असल्याचे समोर आले आहे. तर आठवीतील केवळ ३६.३ टक्के विद्यार्थ्यांनाच भागाकार येत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

अनुदानित शाळांच्या गुणवत्तेतही घट

अनुदानित शाळांमधील गुणवत्ता घसरली असून २०२२ च्या अहवालात ३८.१ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत होता. तर २०२४ च्या अहवालात अनुदानित शाळांमधील ३४.५ टक्के विद्यार्थ्यांनाच भागाकार येत असल्याचे समोर आले आहे, तर स्मार्ट फोन वापरण्यामध्ये ग्रामीण भागातील मुलेही शिक्षित असल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in