भारतातही हुकूमशाही प्रवृत्तीचा शिरकाव; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

अस्थिरतेच्या वातावरणात कोणत्याही समाजाची, प्रांताची वा देशाची प्रगती होत नाही. आज जगभरात अस्थितरतेचे वातावरण वाढत आहे.
भारतातही हुकूमशाही प्रवृत्तीचा शिरकाव; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

पुणे (प्रतिनिधी) :

अस्थिरतेच्या वातावरणात कोणत्याही समाजाची, प्रांताची वा देशाची प्रगती होत नाही. आज जगभरात अस्थितरतेचे वातावरण वाढत आहे. लोकशाही प्रक्रियेतून निवडणूक आलेले लोक हुकूमशाही प्रवृत्तीने वागत आहेत. रशियाचे पुतिन, चीनचे जिनपिंग व अमेरिकेचे बायडेन आधुनिक काळातील हिटलरप्रमाणे वागत आहेत. भारतातही या हुकूमशाही प्रवृत्तीचा शिरकाव होत आहे. ही प्रवृत्ती संसदीय लोकशाहीला मारक आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व पहिल्या विश्वबंधुता संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय आणि भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या संमेलनावेळी उद्घाटक रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. सुभाष वारे, डॉ. विजय ताम्हाणे, मधुश्री ओव्हाळ, प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. अरुण आंधळे आदी उपस्थित होते. मधुश्री ओव्हाळ लिखित 'सम्यक सत्यार्थी' पुस्तकाचे, नंदा कोकाटे लिखित 'पुकार बंधुतेची' काव्यगीताचे प्रकाशन यावेळी झाले.

दुपारच्या सत्रात प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली 'अभिजात मराठी काव्यपंढरी' कविसंमेलन झाले. यामध्ये संगीता झिंजुरके, डॉ. बंडोपंत कांबळे, प्रा. संतोष काळे यांच्यासह राज्यभरातून निमंत्रित कवी सहभागी झाले होते. उमरखेड येथील सचिन शिंदे यांना प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार, संभाजीनगर येथील विजयकुमार पांचाळ यांना प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार, तर मुखेड येथील तुकाराम कांबळे यांना प्रकाशगाथा साहित्यगाथा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने विविध कवींचा सन्मान करण्यात आला.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मधुश्री ओव्हाळ, नंदा कोकाटे यांनी आपले विचार मांडले. कृष्णकुमार गोयल यांनी स्वागतपर भाषण केले. शंकर आथरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी आभार मानले.

बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्काराचे मानकरी

वासंती मेरू (पलूस), पूजा विश्वकर्मा (पुणे), भाग्यश्री बगाड (गुजरात), राम तरटे (नांदेड), चंद्रशेखर महाजन (अकोट), पल्लवी पतंगे (मुंबई), प्रकाश पाठक (संभाजीनगर), गजानन गायकवाड (सिल्लोड), युवराज पाटील (कोल्हापूर), सुरज दिघे (तळेगा), सीमा झुंजारराव (मुंबई) यांना 'बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in