राष्ट्रवादीच्या दोन गटांत चुरस वाढणार!अजित पवार आक्रमक, शरद पवारांचीही रणनीती

उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर असून, शरद पवार गटाचे खच्चीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली
राष्ट्रवादीच्या दोन गटांत चुरस वाढणार!अजित पवार आक्रमक, शरद पवारांचीही रणनीती

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, राष्ट्रवादीच्या दोन गटांनी विरोधी पक्षांपेक्षा परस्परविरोधातच लढतीसाठी राजकीय रणनीती आखण्यावर भर दिला आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर असून, शरद पवार गटाचे खच्चीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी बारामतीत थेट खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रणनीतीचा भाग म्हणून थेट आता ईकडे-तिकडे चालणार नाही, असा सज्जड दम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. तसेच लगेच दुसऱ्याच दिवशी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पाडणारच, असा निर्धार बोलून दाखविला. यासोबतच साताऱ्यातही नवी रणनीती आखायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकसभेत राष्ट्रवादीतील दोन गटातच टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी आता सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली असून, एकीकडे भाजपने लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ प्लस जागा जिंकण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार गटही भाजपसोबत सेटलमेंट करून जागा वाटपाचे सूत्र ठरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले असताना आगामी निवडणुकीत आपले खरे शत्रू कोण, यावर लक्ष केंद्रीत करून त्यावरच हल्लाबोल सुरू केला आहे. यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आघाडीवर असून, त्यांनी थेट शरद पवार यांच्या विरोधातच आक्रमक भूमिका घेतली आहे. याची प्रचिती नुकतीच बारामतीत आली.

बारामतीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी थेट शरद पवारांनाच लक्ष केले. विशेष म्हणजे बारामतीत पहिल्यांदा त्यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडताना आता कार्यकर्त्यांनी इकडे तिकडे केलेले चालणार नाही. एक तर माझ्यासोबत या किंवा तिकडे जा असे सांगतानाच आता मीच बारामतीची विकास करणार, असे सूतोवाच केले. एका अर्थाने त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रणनीती आखायला सुरुवात केल्याचे सूचित केले. दुसरीकडे शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत यावेळी खा. अमोल कोल्हे यांना पराभूत करणार, असा निर्धार बोलून दाखविला. तसेच साताऱ्यातही अजित पवार गट भाजपसोबत नव्याने रणनीती आखण्याची शक्यता आहे.

शरद पवारही लागले कामाला

दुसरीकडे शरद पवार गटानेही काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला सोबत घेऊन नव्याने बांधणी करायला सुरुवात केली असून, महायुतीसोबत तोडीस तोड लढत देतानाच भाजप मित्र पक्षांची कोंडी करण्याचा प्लॅन आहे. त्यासाठी खुद्द शरद पवार हेच पुढाकार घेताना दिसत आहेत. अमोल कोल्हे यांनाही शिरुरमधून नव्याने रणनीती आखण्याचा आज मंत्र दिला. त्यामुळे शरद पवार गटही चांगलाच कामाला लागला आहे. विशेष म्हणजे शरद पवार हे अजित पवारांच्या आक्रमकतेला जशास तसे उत्तर देण्यापेक्षा ग्राऊंड लेवलवर रणनीती आखण्यावर भर देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in