नियम, कायदे सर्वांना सारखे आहेत! अजित पवारांचा मनोज जरांगे-पाटलांना इशारा

मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच देवेंद्र फडणवीस हे माझे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत,
नियम, कायदे सर्वांना सारखे आहेत! अजित पवारांचा मनोज जरांगे-पाटलांना इशारा

मुंबई : मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच देवेंद्र फडणवीस हे माझे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे गंभीर आरोप मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले. या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

“मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण सरकार यासाठी कामाला लागले आहे. प्रत्येकालाच आंदोलन करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. परंतु आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय हे थोडे पाहिले पाहिजे. काहीजण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एसपी यांच्याशी बोलताना शिवराळ भाषा वापरत आहेत. हे नक्की कोण करतेय. एवढे धाडस कसे होते, याची खोलवर चौकशी करण्याची गरज आहे,” असे अजित पवार म्हणाले.

“याआधीही अनेकांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्री एकदा जालन्यात गेले, नवी मुंबईत गेले. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी, सर्वांमध्ये एकोपा राहावा, प्रश्न धसास जावा यासाठीचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री दोनदा आंदोलकांची भेट घ्यायला गेले. याआधी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी फार बारकाईने काम केले जात आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातोय. असे असतानाही वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तव्ये केली जात आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत शिवराळ भाषा केली जाते. अशी पद्धत महाराष्ट्रात कधीही नव्हती. काहीही बोलले तरी खपते, असे कोणी समजू नये. शेवटी सर्वांना नियम आणि कायदे सारखे आहेत,” असा इशाराही अजित पवार यांनी मनोज जरांगेना दिला.

गैरसमज निर्माण करू नये

“कारण नसताना समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आपल्याकडे आरक्षण हे ७२ टक्के झाले आहे. त्यामुळे यावर बारकाईने काम होणे गरजेचे आहे. सगेसोयरेच्या अधिसूचनेवर साडेसहा लाख हरकती आलेल्या आहेत. त्यावर काम चालू आहे. शेवटी काम करताना मागणी कायद्याच्या चौकटीत अशी बसेल, हे पाहणे महत्त्वाचे असते. याची नोंद सर्वांनी घ्यावी. सरकार चांगले काम करत आहे. त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न कोणी करू नये,” असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in