पुणे : लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांच्या पगाराला उशीर होणार असल्याची बातमी चुकीची आहे. या योजनेमुळे शिक्षकांना दरमहा मिळणाऱ्या पगारावर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यातील शिक्षकांचे पगार वेळेतेच होतील, असे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
यासंदर्भातील लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा राज्यातील शिक्षकांच्या पगारावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. नव्या वर्षात शिक्षकांना दर महिन्याला होणाऱ्या पगाराची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी ही भूमिका मांडली.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. तटकरे म्हणाल्या, नागपूर हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनकरिता तरतूद केली होती. २४ तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरू झाले आहेत. दुसऱ्या विभागाचा कुठलाही निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही. प्रत्येकजण, ज्या त्या विभागाचे मंत्री निधीबाबत पाहत आहेत. त्या-त्या विभागाचे मंत्री त्यावर कामदेखील करत आहेत. तसेच शिक्षकांचा पगार होणार नाही, अशी चुकीची अफवा पसरवली जात आहे. मात्र, या योजनेमुळे शिक्षकांच्या पगारावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्याला सुख समृद्धी लाभू दे, असे साकडे तटकरे यांनी यावेळी गणरायाला घातले.