मविआचे जागावाटप १८ ते २० सप्टेंबरला होणार; संजय राऊत यांची माहिती

जागावाटपाचा फॉर्मूला निश्चत केला जाईल आणि याच काळात अंतिम जागावाटपाची प्रक्रियाही पूर्ण होईल, असे राऊत म्हणाले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रएएनआय
Published on

मुंबई : महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे जागावाटप येत्या १८ ते २० सप्टेंबर या तीन दिवस सलग चालणाऱ्या बैठकीत पूर्ण होईल, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली. आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटप करतेवेळी जिंकून येण्याची क्षमता याच निकषावर भर राहील, असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील विधानसभा निवडणुका नाव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी दिले. यापार्श्वभूमीवर महायुती व महाविकास या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. राज्यात प्रथमच अशी परिस्थिती आली आहे की, समोरासमोर असलेल्या दोन्ही आघाड्यांमध्ये प्रत्येकी ३ पक्ष समाविष्ट आहेत. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष तर महाआघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेस पक्ष यांचा समावेश आहे. त्यामुळे जागावाटप करताना दोन्ही आघाड्यांना तडजोड व रस्सीखेचीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

राऊत म्हणाले की, १८ ते २० सप्टेंबर अशी तीन दिवस महाआघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्य या बैठकीत जागावाटपाचा फॉर्मूला निश्चत केला जाईल आणि याच काळात अंतिम जागावाटपाची प्रक्रियाही पूर्ण होईल.

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना जनतेची सहानुभूती असल्याने मागील लोकसभा निवडणुकीत युतीचा फायदा राष्ट्रवादी व काँग्रेसला जास्त झाला, असे बोलले जात होते. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, शिवसेनेची सर्व मते राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडे वळाली. तसेच कोल्हापूर अमरावती आणि रामटेक या शिवसेनेच्या परंपरागत जागा होत्या आणि शिवसेना त्या जागा जिंकत आलेली आहे. यावेळी त्या जागा काँग्रेसला सोडण्यात आल्या होत्या. त्या जागा शिवसेनेनेच लढविल्या असत्या तर आम्ही त्या नक्कीच निवडून आणल्या असत्या.

logo
marathi.freepressjournal.in