अहमदनगरच्या जागेवरून आघाडीतही दावे-प्रतिदावे; जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे, ठाकरे गटाने केला दावा

नगर जिल्ह्यात शरद पवार यांचा प्रभाव अधिक आहे. जिल्ह्यात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे.
अहमदनगरच्या जागेवरून आघाडीतही दावे-प्रतिदावे; जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे, ठाकरे गटाने केला दावा

विशेष प्रतिनिधी/मुंबई : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीत विद्यमान खासदार सुजय विखे यांना विरोध होत आहे. या जागेसाठी आमदार राम शिंदे आणि पारनेरचे आमदार निलेश लंके हेही इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीत जसे दावे-प्रतिदावे सुरू आहेत, तसेच महाविकास आघाडीतही दावे सुरू आहेत. विरोधी पक्षात ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, ही जागा काँग्रेसलाही हवी आहे आणि ठाकरे गटाने तर या जागेवर थेट दावा केला आहे. ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी सोमवारी शिर्डी दौऱ्यात आघाडीत जागावाटप झालेले नाही, परंतु शंकरराव गडाख या जागेसाठी प्रबळ आणि योग्य उमेदवार असतील, असे म्हटले आहे. त्यामुळे या जागेवरूनही आघाडीत वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

खा. संजय राऊत सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. तेथून ते थेट शिर्डीत दाखल झाले. शिर्डीत पोहोचताच पत्रकारांशी बोलताना त्यांनी नगर दक्षिणमध्ये गडाख हेच प्रबळ उमेदवार असल्याचे म्हटल्याने शंकरराव गडाख आता सर्वमान्य उमेदवार होऊ शकतात, असे बोलले जात आहे. परंतु, या जागेवरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत वाद होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नगरची जागा सहजासहजी सोडतील,असे वाटत नाही. मात्र, आघाडीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. शिवसेनेकडे आता इच्छुकांची संख्या वाढत आहे. याचा अर्थ मूळ शिवसेनेकडे जिंकण्याची ताकद आहे. आमची ताकद सर्वांनाच माहीत आहे. आम्ही ठाकरे गट वगैरे मानत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना स्थापन केली. त्यावेळी एकनाथ शिंदे गोधडीत असतील, त्यामुळे आमचीच खरी शिवसेना आहे, असा दावाही त्यांनी केला. आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी ताकदीने लढेल. कारण राज्यावर फार मोठे संकट आले आहे, ते दूर व्हावे आणि महाराष्ट्र गुलामगिरीतून मुक्त व्हावा, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांना चांगले दिवस यावेत, यासाठी राज्यात चांगले सरकार हवे आहे. त्यासाठी साईंचरणी प्रार्थना केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ठाकरे गटाने नाशिकसोबतच नगर जिल्ह्यातही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, जागावाटपाचे त्रांगडे अद्याप कायम असल्याने कोणती जागा कोणाला सुटते, याबाबत उलटसुलट चर्चा रंगत आहे.

शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा

नगर जिल्ह्यात शरद पवार यांचा प्रभाव अधिक आहे. जिल्ह्यात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे ते नगर दक्षिणमधील जागा सहजासहजी सोडतील, असे वाटत नाही. मात्र, उमेदवार कोण मिळतो आणि त्याचे व्यक्तिगत बळ किती, याच्यासोबतच निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन येथे उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे आता तरी याचा अंदाज बांधता येणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

विखेंवर हल्लाबोल

खा. संजय राऊत यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. विखे-पाटील हे महसूल नाही, तर आमसूल मंत्री आहेत, असे ते म्हणाले. त्याला विखेंनी जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राधाकृष्ण विखे-पाटील विरुद्ध इतर सर्व, असे चित्र नगर जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे, असे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in