महायुती व मविआमध्ये जागावाटपाच्या चर्चेला वेग! फडणवीसांच्या गैरहजेरीत शिंदे-अजितदादांमध्ये गुफ्तगू; ‘मविआ’चे १२५ जागांवर मतैक्य

विधानसभा निवडणुका गणेशोत्सवानंतर कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने महायुती व महाविकास आघाडी या दोघांच्याही जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. महायुती व मविआमधील घटकपक्षांमध्ये जागावाटप चर्चेत अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने बैठकांना जोर आला आहे.
महायुती व मविआमध्ये जागावाटपाच्या चर्चेला वेग! फडणवीसांच्या गैरहजेरीत शिंदे-अजितदादांमध्ये गुफ्तगू; ‘मविआ’चे १२५ जागांवर मतैक्य
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुका गणेशोत्सवानंतर कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने महायुती व महाविकास आघाडी या दोघांच्याही जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. महायुती व मविआमधील घटकपक्षांमध्ये जागावाटप चर्चेत अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने बैठकांना जोर आला आहे.

फडणवीसांच्या गैरहजेरीत शिंदे-अजितदादांमध्ये गुफ्तगू

आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजण्याचे संकेत मिळत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा असतानाच बुधवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ बंगल्यावर एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात गुफ्तगू झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीत ही बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला नाकारल्याने विधानसभा निवडणुकीत मतदारराजाचा कौल आपल्या पक्षाला मिळावा यासाठी महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत यांच्यात ‘वर्षा’ बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार व सोमवार असे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र अजित पवार संपूर्ण दौऱ्यात गैरहजर राहिल्याने अजित पवार आणि भाजपमध्ये बिनसल्याची चर्चा होती.

परंतु, सोमवारी ९ सप्टेंबरला अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर दिल्लीला जाण्यासाठी ते मुंबई विमानतळावर पोहोचले. त्यावेळी अजित पवार यांनी शहा यांची भेट घेतली. या भेटीत जागा व मुख्यमंत्रीपद याविषयी अजित पवार यांनी शहा यांच्याबरोबर चर्चा केल्याची चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’ बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना डावलत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रात्री बैठक झाल्याने विधानसभा निवडणुकांपूर्वी काहीतरी घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

‘मविआ’चे १२५ जागांवर मतैक्य; उर्वरित जागांचा तिढा लवकरच सुटणार

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत तीन बैठका झाल्या असून १२५ जागांवर ‘मविआ’त मतैक्य झाल्याचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तर उर्वरित १६३ जागांचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले त्या-त्या पक्षातील उमेदवार देण्याबाबत चर्चा सुरू आहे, असे त्यांनी अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यात काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने काँग्रेस नेते विधानसभा निवडणुकीत जोमाने कामाला लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मविआच बाजी मारणार आणि १८० हून अधिक जागांवर विजय मिळवणार. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीचे कुठलेही आव्हान ‘मविआ’समोर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीशी तुलनाच नको

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो वा निधीवाटप महायुतीतील नेते एकमेकांवर तुटून पडताहेत. त्यात जागावाटपावरुन महायुतीत धुसफूस सुरू आहे, तर महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण चर्चा सुरू असून कुठलाही वादविवाद नाही. त्यामुळे महायुतीशी महाविकास आघाडीची तुलना नको, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

मुस्लिम उमेदवार देण्याची चाचपणी

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाबद्दल कायमच आपली भूमिका मांडलेली आहे. ते धर्माचा भेद करत नाहीत. ते चुकीचे वागणारे आणि देशविरोधी मुस्लिमांना विरोध करतात, असेही ते म्हणाले. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना त्यांचे प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे. त्यासाठी मुस्लिम उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in