पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाने एकीकडे मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरातील मराठा समाज, खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला पत्र पाठवून मराठा समाजातील नागरिकांच्या जमिनींची माहिती मागविली आहे. मराठा समाजातील कुटुंबाकडे किती जमीन आहे, याबाबतची १९६० ते २०२० या कालावधीतील माहिती आयोगाने सरकारकडे मागवली आहे.
एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये, शेतकरी संख्या आणि मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या, यांचा समावेश असलेली माहिती मागविली आहे. त्या नमुन्यानुसार ही माहिती महसूल विभागाकडून प्राप्त करून देण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाकडे केलेली आहे. दरम्यान, या पत्राची प्रत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देखील पाठविण्यात आलेली आहे.