विशेष प्रतिनिधी/मुंबई : राज्यात सत्ताधारी नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या, पातळी सोडून होत असलेले आरोप, त्यातच थेट आमदाराने पोलिस स्थानकात केलेला गोळीबार, माजी नगरसेवकाची फेसबुक लाईव्ह गोळ्या घालून हत्या, पुण्यात झालेला भाजप कार्यकर्त्यांचा राडा यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मागील २ महिन्यांतील घटना महाराष्ट्राची प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळवणाऱ्या आहेत. राज्यपाल महोदयांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने शनिवारी राज्यपालांची भेट घेऊन केली.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात जाऊन भेट घेतली आणि या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसिम खान, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, चंद्रकांत हंडोरे, अतुल लोंढे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्यात थेट पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार, हल्ले होत आहेत. दिवसाढवळ्या खून केले जात आहेत. तसेच सत्ताधाऱ्यांचेच लोक कायदा हातात घेऊन मनमानी करून लोकशाहीत आवाज दाबत आहेत. राज्यात मागच्या काही दिवसांतील स्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याबाबत अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला बरखास्त करावे, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, सध्या येथे गुंडांचे राज्य सुरू झाले आहे. रोज उठून कुणी तरी धमकी देत आहे आणि हल्लेही होत आहेत. तसेच सत्ताधा-यांशी संबंधित मंडळीच कायदा हातात घेऊन धुडगूस घालत आहेत. त्यामुळे राज्यात सलोखा, शांतेतेचे वातावरण कायम ठेवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर आता थेट राज्यपालांची भेट घेऊन महायुतीचे सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली.
सरकारच्या आश्रयाने राज्यात गुंडगिरी : ठाकरे
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पुरती ढासळली असून, राज्य सरकारच्या आश्रयाने गुंडगिरी सुरू आहे. त्यातच गुंडांना मिळणारे संरक्षण चिंतेचा विषय बनत चालला असून, यामुळे राज्यातील जनता दुखावली आहे. आमचा युवा कार्यकर्ता अभिषेक याची हत्या झाली. त्याच्यावर हल्ला करणारा गुंड त्याने आत्महत्या केली. भाजपच्या आमदाराने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला. पुण्यात भाजपच्या लोकांनी धुडगूस घातला. त्यामुळे राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि निवडणुका घ्याव्यात, असे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.